पुण्याला उणे नाही, रिंग रोड, नवे विमानतळ ते महिला वसतिगृह, अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रा अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला (Maharashtra Budget 2020).
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला (Maharashtra Budget 2020). या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये रिंग रोड, मेट्रो, नवे विमानतळ यांचा समावेश आहे. याशिवाय पुण्यात काम करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी वसतिगृह उभारणार असल्याचीदेखील घोषणा यावेळी अजित पवारांनी केली (Maharashtra Budget 2020).
रिंग रोड चार वर्षात उभारणार
“पुणे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. औरंगाबाद, हैदराबाद, बंगळुरु यासारख्या मोठ्या शहरातून पुण्यात वाहनं येतात. या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पुणे शहरात बाहेरुन रिंग रोड करण्यात येईल. तसा प्रस्ताव सरकारसमोर असून चार वर्षात हा रिंग रोड तयार करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे”, असं अजित पवार यांनी सांगितलं.
अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे पुणेकरांची अजित पवारांकडे मोठ्या अपेक्षा होत्या. पुण्यात वाहकतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी रिंग रोड प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र, या रोडसाठी भूसंपादनाचा विषय प्रलंबित असल्याने त्यासाठी शासनाकडून मोठ्या निधीची आवश्यकता होती. राज्य सरकारकडून या प्रकल्पाला पुरेसा निधी न मिळाल्याची खंत याअगोदर अजित पवार यांनी व्यक्त करुन दाखवली आहे. त्यामुळे यावर्षीच्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी रिंग रोडसाठी महत्त्वपूर्ण तरतूद केली आहे. हा रोड चार वर्षात पूर्ण करण्याचा मानस राज्य सरकारचा आहे.
मेट्रोसाठी भरीव निधी उभारणार
“पुण्यात मेट्रोचं काम सुरु आहे. मागच्या सरकारच्या काळात देण्यात आलेल्या निधीपेक्षा जास्त निधी आगामी वर्षात देण्यात येईल. त्याचबरोबर पुणे मेट्रोचा विस्तार करण्याचा प्रस्ताव आहे. स्वारगेट ते कात्रजपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्यात येणार आहे”, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.
पुण्यात नवे विमानतळ उभारणार
“पुणे आणि सोलापूरला नवे विमानतळ उभारणार”, अशीदेखील घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावाला 400 कोटींचा निधी
पुण्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावाला राज्य सरकारकडून 400 कोटी रुपयांचा निधी देणार, अशी घोषणा अजित पवार यांनी केली. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिडा संकुल असलेल्या बालेवाडीत आंतरराष्ट्राय क्रीडा विद्यापीठ सुरु करणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं.
मागासवर्गीय महिलांसाठी वसतिगृह उभारणार
“पुण्यात नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी एक हजार क्षमतेचं वसतिगृह राज्य सरकार उभारणार”, अशीदेखील घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली.
संबंधित बातम्या :
Maharashtra Budget 2020 Live Updates : महाराष्ट्र अर्थसंकल्प जसाच्या तसा!
BUDGET 2020 : आमदारांच्या निधीत एक कोटींची वाढ, बाकं वाजवून अजित पवारांच्या निर्णयाचे स्वागत
Stamp Duty Decreased | मुद्रांक शुल्कात 1 टक्का सवलत, गृह खरेदीदारांना दिलासा