महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीत कोणी मारली बाजी? पाहा कुणाला किती जागा?
ग्रामपंचायत निवडणुकीत आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय.
मुंबई : राज्यातील जवळपास साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. ही निवडणूक शिंदे-फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडी दोघांसाठी फार महत्त्वाची आहे. कारण राज्यात सहा महिन्यांपूर्वी सत्तांतर झालंय. या सत्तांतरादरम्यान आणि नंतर आतापर्यंत अनेक घडामोडी घडल्या आहेत. या घडामोडींवर राज्याची जनता काय विचार करते, राज्यातील जनतेचा शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा आहे की महाविकास आघाडीच्याप्रती सहानुभूती आहे, हे जाणून घेण्यासाठी राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक ही चांगली संधी आहे. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीचे निकाल आता समोर येत आहे. यामध्ये शिंदे-फडणवीस यांच्या युतीला ग्रामीण भागातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे भाजपला सर्वाधिक जागांवर विजय मिळालाय.
ग्रामपंचायत निवडणुकीत आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवाडीनुसार भाजपला सर्वाधिक 2102 ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळालाय. तर शिंदे गटाला 803 ग्रामपंचायतींमध्ये मिळालाय.
भाजप आणि शिंदे गटाच्या युतीला आतापर्यंत 2996ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाल्याचं चित्रय. तर महाविकास आघाडीला 2950 जागांवर विजय मिळालाय. मतमोजणी अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे अंतिम आकडेवारी आल्याशिवाय नेमका कुणाचा खरा विजय झालाय हे म्हणता येणार नाही. पण मतमोजणी आता जवळपास पूर्ण होत आलीय. आणि आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार या निवडणुकीत भाजपची सरशी असल्याचं चित्रय.
एकनाथ शिंदे यांचा गट कितव्या क्रमांकावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांना सोबत घेऊन महाविकास आघाडीतून आपला पाठिंबा काढला होता. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत नवं सरकार सत्तेत आणलं. या सत्तांतरानंतर सहा महिन्यांनी राज्यात ग्रामपंचायत निवडणूक पार पडतेय. या निवडणुकीच्या निकालात शिंदे गटाला कितवं स्थान आहे हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं ठरेल. या निवडणुकीत शिंदे गट हा शेवटून दुसरा ठरला आहे. एकनाथ शिंदे गटाला आतापर्यंत 803 ग्रामपंचायतींवर यश मिळाल्याची माहिती समोर आलीय.
7751 पैकी 7246 ग्रामपंचायतींचा निकाल आतापर्यंत समोर
1) भाजप – 2193
2) राष्ट्रवादी काँग्रेस – 1448
3) इतर – 1300
4) काँग्रेस – 841
5) शिंदे गट – 803
6) ठाकरे गट – 661
महाविकास आघाडीचा 2996 ग्रामपंचायतींवर विजय झालाय. तर शिंदे गट आणि भाजप यांच्या युतीचा 2950 ग्रामपंचायतींमध्ये विजय झालाय.