विरोधी पक्षाच्या गोटातील आतली बातमी, बडे नेते बीड आणि परभणीला जाणार?
महाराष्ट्रातील बीड येथील सरपंच हत्याकांड आणि परभणीतील आंदोलकाचा पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी विरोधी पक्षाचे नेते बीड आणि परभणीला जाणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर येत आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्याचं सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. असं असताना विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेते येत्या बुधवारी बीडमधील मस्साजोग आणि परभणीमधील हिंसाचार प्रकरणातील ठिकाणी भेट देणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात बीडचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव समोर येत आहे. त्या प्रकरणावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून टीका करण्यात आली होती. हा विषय अधिवेशनात सुद्धा मांडण्यात आला होता. दुसरीकडे परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलकाचा मृत्यू हा पोलीस कस्टडीमध्ये झाला होता. या घटनेबाबतही विरोधी पक्षाकडून जाब विचारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “संतोष देशमुख यांची हत्या होवून आज आठ दिवस झाले. मात्र अद्याप म्हणावी तशी कारवाई झाली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल स्पेशल एसआयटी मार्फत तपास करू, अशी घोषणा केली आहे. त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आता लवकरच न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे”, असं धनंजय देशमुख म्हणाले.
‘माझ्या भावाची क्रूर हत्या, अधिवेशनात सर्वच आमदार आवाज उठवतील, अशी अपेक्षा’
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टेटमेंट केल्यानंतर ग्रामस्थांनी एक बैठक घेतली. उद्या दहावा विधी आहे. त्यामुळे आम्ही दिलेला अल्टिमेटम यावर आणखी दोन दिवस विचार करणार आहोत. माझ्या भावाची क्रूर हत्या झाली. बीडसह राज्यातील सर्वच आमदारांनी पाहिले आहे. त्यामुळे या अधिवेशनात हे सर्वच आमदार आवाज उठवतील, अशी अपेक्षा आहे”, असं धनंजय देशमुख म्हणाले.
“माझ्या भावाची हत्या जातीवादातून झाली नाही. सर्वच आरोपी वंजारी समाजाचे आहेत. वंजारी समाजासोबत आमचे ऋणानुबंध आहेत. या गोष्टीची शहानिशा केली पाहिजे. राजकारण्यांनी यात जात आणू नये. काही लोक जात समोर आणून हा मुद्दा पुढे आणत आहेत. इथे दलित, वंजारी, मराठा यांसह सर्वच आठारा पगड जातीतील लोकांनी आमचे सांत्वन केले आहे. आमची विनंती आहे. आरोपींची ही विकृती आहे. यात कोणीही जात समोर आणून राजकारण करू नये. मंत्री पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यातले आहे. ते दोघेही देशमुख कुटुंबासाठी कसे न्याय मिळवून देतील? याकडे आमचे लक्ष आहे”, असं सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले.