शाळा, मंदिरांनंतर आता राज्यातील सिनेमागृह, नाट्यगृह सुद्धा सुरु होणार, राज्य सरकारचा निर्णय
आता राज्यातील सिनेमागृह सुरु करण्यासही राज्य सरकारनं संमती दिल्याचं कळतंय. 22 ऑक्टोबरपासून राज्यातील सिनेमागृह सुरु होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्याचबरोबर नाट्यगृहांबाबतही राज्य सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे.
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर आता राज्य सरकारनं महत्वाचे निर्णय घ्यायला सुरुवात केलीय. त्यानुसार राज्यातील शाळा आणि मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळं सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यापाठोपाठ आता राज्यातील सिनेमागृह सुरु करण्यासही राज्य सरकारनं संमती दिल्याचं कळतंय. 22 ऑक्टोबरपासून राज्यातील सिनेमागृह सुरु होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्याचबरोबर नाट्यगृहांबाबतही राज्य सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे. (Mahavikas Aghadi government’s big decision to start cinemas in Maharashtra from 22 October)
मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल. आज टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली.
नवरात्रीपासून राज्यातील मंदिरे सुरु होणार
तत्पूर्वी शुक्रवारी राज्य सरकारनं शाळा आणि मंदिरे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल. धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये.
शाळा सुरु करण्याचाही निर्णय
दरम्यान आज सकाळी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. आता, 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करुन शाळा सुरु होतील. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यानं राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.
राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात एकदा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी तो निर्णय स्थगित करण्यात आला होता. मुख्यमंत्री यांनी कोरोनाचे नियमांचं पालन करुन शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षीपासून शाळा बंद होत्या. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बहुतांश ठिकाणी लसीकरण झालं आहे. शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचं लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
इतर बातम्या :
अनिल परबांवर कवितेतून टीका, तर टोपेंवर टक्केवारींवरून हल्लाबोल; सदाभाऊ खोत यांचा घणाघात सुरूच
Mahavikas Aghadi government’s big decision to start cinemas in Maharashtra from 22 October