बैठकांवर बैठका, चर्चांच्या अनेक फेऱ्या, महायुतीमधील जागा वाटपाचा सस्पेन्स संपेना, या आहेत वादाच्या आठ जागा
mahayuti leaders: महायुतीने संयुक्त प्रचाराची रणनीती आखली आहे. परंतु उमेदवार जाहीर न झाल्याने प्रचारावरही मर्यादा येण्याची चिंता महायुतीमधील तिन्ही पक्षातील नेत्यांना आहे.
राज्यातील मतदानाचा पहिला टप्पा आता सहा दिवसांवर आला आहे. मतदान असणाऱ्या विदर्भातील पाच जागांवर जोरदार प्रचार सुरु झाला आहे. राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय नेत्यांच्या प्रचार सभा होत आहेत. परंतु महायुतीत अजूनही सर्व अलबेल नाही. महायुतीमधील आठ जागांवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे मतैक्य झाले नाही. मुंबईतील दक्षिण मुंबईसह तीन जागा आणि ठाणे, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर अशा ८ जागांवर अजूनही महायुतीमध्ये मतैक्य झाले नाही. यामुळे या ठिकाणी उमेदवार ठरले नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीने सर्व ४८ जागांवरील वाद मिटवला आहे.
उमेदवार नसताना अशी रणनीती
आठ जागांवर उमेदवार ठरेल तेव्हा ठरेल, पण प्रचारात आघाडी घेता यावी, यासाठी महायुतीने संयुक्त प्रचाराची रणनीती आखली आहे. परंतु उमेदवार जाहीर न झाल्याने प्रचारावरही मर्यादा येण्याची चिंता महायुतीमधील तिन्ही पक्षातील नेत्यांना आहे. भाजप आणि शिवसेनेच्या राज्यातील पक्षनेतृत्वाने त्यावर तोडगा काढताना आपआपल्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मतदारसंघात प्रचार करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई वारीनंतर नाशिक सस्पेन्स कायम
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या मुंबई वारीनंतर देखील नाशिकच्या जागेबाबत सस्पेन्स कायम आहे. नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी मुंबईत जाऊन नाशिकच्या जागे संदर्भात चर्चा केली. या दोन्ही नेत्यांच्या मुंबई दौऱ्यानंतर देखील नाशिकच्या जागेवर उमेदवार जाहीर झाला नाही. दुसरीकडे छगन भुजबळ देखील गेल्या तीन दिवसांपासून नाशिकमध्ये मुक्काम ठोकून आहे. अजून दोन दिवस नाशिकच्या जागेवर निर्णय होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार जोरात प्रचार करत असताना दुसरीकडे महायुतीचा उमेदवार मात्र अद्याप जाहीर न झाल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
भाजपचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होणार
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा उद्या १४ एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि नवरात्रीतील सहावा दिवस साधून भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. भाजपच्या जाहीरनाम्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.