‘शरियत’ सारखा कायदा आणा, मगच बलात्कार थांबतील; नाशिकमध्ये राज ठाकरेंचा सल्ला
'शरियत (Sharia) सारखा कायदा आणा. मगच बलात्कार थांबतील,' असा सल्ला राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
नाशिकः ‘शरियत (Sharia) सारखा कायदा आणा. मगच बलात्कार थांबतील,’ असा सल्ला राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. (Make a law like Sharia, then rape will stop; Raj Thackeray’s advice in Nashik)
नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्ष संघटनेत अनेक फेरबदल केले आहेत. यावेळी पत्रकारांनी त्यांना वाढत्या महिला अत्याचारांबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा राज म्हणाले की, ‘महिलांवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. याला आपली व्यवस्था कारणीभूत आहे. कोणाला कायद्याचा धाक नाही. कोणाला कायद्याची भीती राहिली नाही. त्यामुळं शरियत सारखा कायदा आणा. मगच महिलांवर अत्याचार थांबतील. लोकांमध्ये कायद्याचा धाक आणि भीती निर्माण होईल,’ असं ते म्हणाले.
‘ईडी’चा खेळ
राज म्हणाले, ‘राज्यातील गंभीर प्रश्नांना बगल देणं सुरू आहे. त्यासाठीचे ईडी वगैरे खेळ आणि त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांची राळ उठवणं सुरू आहे. यातून काय निष्पण्ण होतं,’ असा सवालही त्यांनी केला. ‘मुंबई-नाशिक हा माझा कालचा प्रवास नुसता खड्डेमय मार्गावरून होता. या खड्ड्यांमध्ये चक्क पाच स्पीड ब्रेकर लागले. रस्त्यांचा हा खेळखंडोबा कधी थांबणार, याचे उत्तर राज्यातल्या जनतेला हवे आहे,’ अशी तोफ राज यांनी डागली.
लोकांनीच कोर्टात जावे
‘महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारनं प्रभाग रचनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल, तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असणार आहे. महापालिकेच्या या प्रभाग रचनेवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. राज्य सरकार लोकांना गृहित धरत आहे. माझी विनंती आहे की आता लोकांनीच कोर्टात जावे,’ असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले आहे.
‘हे सगळं राजकीय फायद्यासाठी सुरू’
‘आपल्याला पद्धतीने, आपल्या सोयीने प्रभाग तयार करणे आणि त्यातून निवडणुका जिंकणे. पण या सगळ्याचा त्रास लोकांना का? लोकांनी एका उमेदवाराला मतदान करायचे सोडून 3 – 3 उमेदवारांना मतदान का करायचे? म्हणजे सर्व जनतेला गृहित धरायचे, आपल्याला हवे त्या पद्धतीनं प्रभाग करायचे, खरं तर हे योग्यच नाही, कायदेशीर नाही. निवडणूक आयोगाने यावर कारवाई केली पाहिजे. इथे महाराष्ट्राचा कायदा वेगळा आणि देशाचा कायदा वेगळा असे काही आहे का? हे दोनचे प्रभाग, तीनचे प्रभाग, चारचे प्रभाग कसला खेळ चालू आहे? उद्या तुम्ही तीन-तीन आमदार, तीन-तीन खासदारांचा एक प्रभाग करणार आहात का? हे सगळं यांच्या फायद्यासाठी सुरू आहे’, असा आरोपही राज ठाकरेंनी केलाय. (Make a law like Sharia, then rape will stop; Raj Thackeray’s advice in Nashik)
इतर बातम्याः
निवडणुकीआधी राज ठाकरेंचा षटकार; नाशिक मनसेमध्ये मोठे फेरबदल!