24 डिसेंबरनंतर मराठा समाजाचे पुढचे आंदोलन कुठे? मनोज जरांगे पाटील यांनी केली घोषणा
manoj jarange patil and maratha reservation | मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी पुन्हा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात रात्रीही त्यांच्या सभांना मोठी गर्दी होत आहे. २४ डिसेंबरनंतर सरकारला एक दिवसही मिळणार नाही. २५ डिसेंबर रोजी आपण आपली भूमिका जाहीर करु, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
संजय सरोदे, जालना | 16 नोव्हेंबर 2023 : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या विविध ठिकाणी सभा होत आहे. आरक्षण देण्यासाठी त्यांनी २४ डिसेंबर ही मुदत दिली आहे. मराठा समाजास या तारखेपर्यंत आरक्षण मिळाले नाही तर पुन्हा मोठे आंदोलन सुरु करणार आहे. आता हे आंदोलन जालन्यात नाही तर मुंबईत सुरु करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. २४ डिसेंबरनंतर सरकारला एक दिवसही मिळणार नाही. २५ डिसेंबर रोजी आपण आपली भूमिका जाहीर करु, असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यात सभांना प्रचंड गर्दी
मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी राज्याचा दौरा सुरु केला आहे. त्यासाठी ते ठिकठिकाणी सभा घेत आहेत. या सभांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. सभांना येण्यासाठी लोक कामावर जात नाहीय. रात्री घेतलेल्या सभांनाही तुफान गर्दी होत आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. जेजुरीला खंडेरायला नतमस्तक होऊन सरकारला सुबुद्धी द्यावी, हे साकडे आपण घालणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
लपवलेले पुरावे बाहेर आले
आतापर्यंत सत्तेवर आलेल्या सगळ्याच सरकारने आमच्या लेकरांचे आतापर्यंत वाटोळं केलंय आहे. मराठा समाजासंदर्भातील पुरावे लपवलेले आहेत. पण लपवलेले पुरावे आता बाहेर येत आहे. म्हणून सरकार घाबरले आहे. आता आम्हाला आरक्षण मिळेल याची खात्री आहे. अन्यथा 24 नंतर पुढचे आंदोलन मुंबईत असणार आहे. आमच्या रात्रीच्या सभाही हाऊसफुल्ल होताय. रात्रंदिवस जागून आम्ही आशीर्वाद घेतोय. मराठा गाठीभेटीसाठी हा दौरा आहे.
अन्यथा 25 डिसेंबरपासून मोठे आंदोलन
24 डिसेंबरपर्यंत सरकार काय करते हे आम्ही बघत आहोत. आरक्षण बाबत निर्णय घेतला नाही तर 25 तारखेला बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार आहोत. तशी वेळ येणार नाही, असा विश्वास आम्हाला आहे. परंतु वेळ आलीच तर आरक्षणासाठी आम्ही सज्ज आहोत. सरकारला कायदा पारीत करावा लागत असेल तर त्याला आधार पाहिजे आणि आता कुणबी नोंदी लाखांत सापडत आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत कायदा करण्यात काहीच अडचण नाही. सरकारवर माझा विश्वास आहे आणि नाही तर लढायला सज्ज आहोत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
ओबीसीत रोष नाही, फक्त दोन-चार जण…
मराठा आरक्षणाबाबत ओबीसी समाजात रोष नाही. फक्त दोन-चार जणांचा हा विषय आहे. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडत असल्यामुळे मराठा समाज पूर्वीपासूनच ओबीसीमध्ये आहे. सामान्य ओबीसींच्या लक्षात आले आहे की, मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण त्यांना दिले पाहिजे. परंतु राजकीय स्वार्थासाठी दोन-चार जणांची खटपट सुरू आहे.
तर मराठा समाज पुढे गेला असता
आता कुणबी जातीचे रेकॉर्ड कसे मिळत आहे. सत्तर वर्षांपासून आमच्या पोरांचं वाटोळं केलं गेले आहे. त्यांना आरक्षण मिळाले असते तर आज मराठा समाज सर्वात पुढे गेला असता. यामुळे आंदोलन करण्याची वेळ आली नसती. आज खंडेरायाचे दर्शन घेऊन सरकारला सदबुद्धी द्यावी असं मागणं मागणार आहे आणि लवकर आरक्षण मिळू द्या हेच सगळं खंडेरायाच्या चरणी साकडे घालणार आहे.