‘नाहीतर तुमचा सुपडा साफ होईल’, मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत इशारा
"आमची आणखी तरी प्रामाणिक भूमिका आहे. मला आणि समाजाला राजकारणात जायचे नाही. मला त्यामध्ये ढकलू नका. मी जर गेलो तर तुम्ही बांधलेली गणितं सगळी चुकणार आहेत. मला हलक्यात घेऊ नका", असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत त्यांना चॅलेंज दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला आरक्षण द्यावं. आपल्याला राजकारणात उतरण्यात रस नाही. आरक्षण मिळालं नाही तर आपण राजकारणात उतरणार. तसेच आपण राजकारणात उतरलो तर तुमचा सुफडा साफ होईल, असा इशाराच दिला. “शेवटी आता सत्ताधाऱ्यांनी ठरवलं आहे की, गोरगरिबाला न्याय द्यायचा नाही मग आता गोरगरिबांनी ठरवलं आहे त्यांना खुर्ची द्यायची नाही. मग संघर्ष करायची वेळ येईल. संघर्ष करायचा, पण आता खुर्ची त्यांना द्यायची नाही, हीच भूमिका आता शेतकऱ्यांची पण आहे. सगळ्या जाती-धर्माच्या बांधवांची आहे. मराठ्यांची पण आहे, दलित मुस्लिमांची पण आहे. तुम्हाला आणखी पुढे-पुढे या 20 तारखेपर्यंत खूप आणखी चित्र बदललेले दिसतील. मी आता जबाबदारीने सांगतो आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गणित बांधले आहे. पण ते फेल होणार आणि त्यांना पश्चाताप होणार”, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.
“आमची आणखी तरी प्रामाणिक भूमिका आहे. मला आणि समाजाला राजकारणात जायचे नाही. मला त्यामध्ये ढकलू नका. मी जर गेलो तर तुम्ही बांधलेली गणितं सगळी चुकणार आहेत. मला हलक्यात घेऊ नका. माझी इच्छा नाही. राजकारणात मी जर एकदा घुसलो तर परिणामाची चिंता करत नाही. मी शेतकऱ्यांपासून 12 बलुतेदारांचे, ओबीसी, शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे, मराठ्यांचे राज्य आणल्याशिवाय मागे सरकणार नाही. फडणवीस साहेब तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर घ्या. नसेल घ्यायचं तर माझा नाईलाज आहे”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
‘मी राजकीय भाषा बोलू नको तर कोणती भाषा बोलू?’
“मला राजकारणात जायचे नाही. मी पुन्हा पुन्हा सांगत आहे, तुमचे दोन-चार जण म्हणत आहेत की मी राजकीय भाषा बोलत आहे. तुम्ही आरक्षण देणार नसलात तर मी राजकीय भाषा बोलू नको तर कोणती भाषा बोलू? तुम्ही आरक्षण द्या. राजकीय भाषा बंद करतो. पण तुम्ही आरक्षण देणार नसाल तर मग मी भाषा बोलू कोणती?”, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.
“माझ्या पुढे आणि माझ्या समाजापुढे दुसरा पर्याय काय आहे, देणार नाही म्हणल्यावर सत्ता आरक्षण देते. मग सत्ताकडे जावे लागेल. समाजाचे आणि माझे काय चुकते? तुम्ही त्या खुर्चीसाठी जर माझ्या समाजाचे मतदान घेऊन माझ्या समाजाच्या लेकराबाळांचे वाटोळे करणार असाल तर तर ती खुर्चीच आम्ही तुम्हाला मिळून देणार नाही”, अशा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. “तुम्हाला भाषा कळत नाही. तुम्ही वचवच करण्याची सवय आहे. मार्ग काढायचा नाही. बोलायचे नाही. नुसता नेता आणि पक्ष याचे तुंतूने वाजत बसायचे, एवढाच धंदा आहे”, अशी टीकादेखील जरांगे यांनी यावेळी केली.
“देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण द्यावे. त्यांना हे मराठे डोक्यावर घेऊन नाचतील. आम्हाला राजकारण काय करायचे आहे? तुम्ही आरक्षण दिले नाही तर आम्ही उभे राहणारच. तुमचे राजकीय गणित आम्ही बिघडवणार. मला राजकारणात पाय ठेवायला लावू नका. नाहीतर तुमचा सुपडा साफ होईल”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.