दारूगोळा बनवण्याचे काम सुरू असताना नागपूरमध्ये कंपनीत स्फोट, नऊ जणांचा मृत्यू
Nagpur blast | नागपुरातील सोलार एक्सप्लोरी कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. रविवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारात झालेल्या स्फोटमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. कंपनीत दारूगोळा बनवण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे.
गजानन उमाटे, नागूपर, 17 डिसेंबर | पुणे येथील स्पार्क कँडल बनवणाऱ्या कारखान्यात मागील आठवड्यात आग लागली होती. या आगीत सात जणांचा मृत्यू झाला होता. केकवर लावण्यात येणाऱ्या मेणबत्त्या आणि स्पार्क कँडल तयार करण्याचे काम या कारखान्यात सुरु होते. या घटनेच्या आठवडाभरानंतर आता नागपुरातील सोलारएक्सप्लोरी कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. रविवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारात झालेल्या स्फोटमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. कंपनीत दारूगोळा बनवण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
केमिकलमुळे झाला स्फोट?
नागपुरातील सोलर एक्सप्लोरी कंपनी संरक्षण क्षेत्राला लागणारा दारुगोळा निर्मितीचे काम करते. नागपूरमधील बाजारगाव या गावात ही कंपनी आहे. कंपनीच्या कास्ट बूस्टर प्लँन्टमध्ये पॅकिंगचे काम सुरु होते. त्यावेळी अचानक स्फोट झाला. रविवारी सकाळी नऊ वाजता झालेल्या या स्फोटामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तर तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे. या कंपनीत संरक्षण क्षेत्राशी संबंधित दारूगोळा निर्मितीचे काम सुरु असते. त्यात मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर होत असतो. या केमिकलमुळे हा स्फोट झाला असल्याची शक्यता आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.
Maharashtra | There has been a blast in the Solar Explosive Company in Bazargaon village of Nagpur, this blast happened at the time of packing in the cast booster plant in the Solar Explosive Company. More details awaited: Nagpur Rural Police
— ANI (@ANI) December 17, 2023
पोलीस आणि बचावपथक घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीण पोलीस घटनास्थळी आले. तसेच बचावपथकही दाखल झाले. अग्नीशमन दलाच्या गाड्या पोहचल्या. अग्नीशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. परंतु या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोलार कंपनी ही भारतातील अनेक कंपन्यांना दारुगोळा सप्लाय करत असल्याची माहिती मिळाली. नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना ही घटना घडली आहे. या घटनेचे पडसाद सोमवारी सभागृहात उमटणार आहे.
मृतांच्या वारसांना पाच लाख
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत ट्विट केले आहे. त्यात त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. फडणवीस यांनी म्हटले आहे की, नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात 6 महिलांसह 9 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे. संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे. नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात असून स्वतः IG आणि पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. त्याला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मान्यता दिली आहे.