Medical Exam| कोरोनामुळे मेडिकलच्या परीक्षा पुढे ढकलल्या; कधीपासून होणार पेपर?
राज्यात ओमिक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षक आणि विद्यार्थी यांची रुग्णसेवेसाठी गरज भासू शकते हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिकः कोरोनाचे झपाट्याने वाढणारे रुग्ण पाहता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यात ओमिक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षक आणि विद्यार्थी यांची रुग्णसेवेसाठी गरज भासू शकते हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
बैठकीत निर्णय
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला विद्यापीठाच्या कुलगुरू, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त वीरेंद्र सिंग, संचालक, डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक, डॉ. अजय चंदनवाले, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कधी होणार परीक्षा?
पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा या 17 जानेवारी 2022 पासून सुरु होणार होत्या. आता या परीक्षा 14 फेब्रुवारी 2022 पासून घेण्यात येणार आहेत. तर पदवीच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा या 31 जानेवारी 2022 पासून सुरू होणार होत्या. आता या परीक्षा 28 फेब्रुवारी 2022 पासून घेण्यात येणार आहेत. कदाचित कोरोना प्रकोप वाढल्यास या परीक्षाही ऐनवळी पुढे ढकलल्या जाऊ शकतात, असा अंदाज व्यक्त होत आहे.
7 नवे विषय सुरू
आता नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था सुरू करण्यासाठी एकूण 7 विषयांना शासनस्तरावर मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार 2022-23 या शैक्षणिक वर्षात अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांची निवड करून या अभ्यासक्रमांना सुरुवात केली जाणार आहे. तब्बल 670 कोटी रुपयांचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे
शुल्कात सवलत
विद्यापीठाच्या संलग्निकरण नूतनीकरण प्राप्त प्रशिक्षण केंद्रांमध्ये अनेक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. कोविड-19 आजाराची स्थिती पाहता यातील काही अभ्यासक्रमांसाठी निर्धारित शुल्क भरण्यासाठी 50 टक्के शिथिलता देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना चांगले व कौशल्यपूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विद्यापीठाकडून विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
इतर बातम्याः
Nashik Corona|कोरोनाविरोधात लढा आमचा सुरू; 13 अधिकाऱ्यांची नियुक्ती, प्रशासनाने काय केली तयारी?
Sahitya Sammelan|साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर; उदगीरमध्ये कन्नड, उर्दू, तेलगूचाही होणार सन्मान…!
Nashik Train| नाशिक रेल्वे मार्गावरच्या 10 गाड्या आज रद्द; प्रवाशांचे पुन्हा बेहाल!