दरवर्षी लोकं उष्माघाताने मरतात, राऊत जबाबदारी घेणार काय?; संजय गायकवाड काय म्हणून गेले?
मंत्री संजय राठोड यांचे हितशत्रू प्रचंड प्रमाणात आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर टीका केली जाते. त्यांची चांगली चाललेली प्रगती दिसत नाही. बंजारा समाजाचे युवा नेतृत्व खतम करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे षड्यंत्र केली जात असून आम्ही ती हाणून पाडू, असं संजय गायकवाड म्हणाले.
बुलढाणा : खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघातामुळे 12 लोकांचा मृत्यू झाला. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. सत्ताधाऱ्यांच्या बेपर्वाईमुळेच हे बळी गेल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. या प्रकरणी विरोधकांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर राज्य सरकारच बरखास्त करण्याची मागणी केली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. त्यावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी हल्लाबोल करताना धक्कादायक विधान केलं आहे. दरवर्षी उष्माघाताने लोक मरतात. त्याची जबाबदारी संजय राऊत घेणार का? असं धक्कादायक विधान संजय गायकवाड यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
उष्माघाताची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले होते. त्यावर संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मग अडीच हजार लोक उष्माघाताने मेली याची जबाबदारी संजय राउत घेणार का? दरवर्षी लोक मरतात याची जबाबदरी संजय राऊत घेणार का? असं धक्कादायक विधान संजय गायकवाड यांनी केलं.
उष्माघातामुळे लोक मेल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट झालं आहे. झालेली घटना दुर्देवी आहे. पण आतापर्यंत अडीच हजार लोक उष्माघाताने मेले आहेत. हा कार्यक्रम संध्याकाळी घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र श्री सदस्याच्या आग्रहाने हा कार्यक्रम दुपारी घेतला. केवळ ही दुर्घटना असून कोणालाही दोष देऊ नये, असं आवाहन गायकवाड यांनी केलं.
302चे स्वरुप का देता?
खारघर दुर्घटनेप्रकरणी शिंदे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे. त्यावर त्यांनी संताप व्यक्त केला. एखादी अमेरिका आणि पाकिस्तानची घटना आणा आणि करा पुढील कारवाई. ही घटना दुर्देवी होती. त्या घटनेला तुम्ही 302चे स्वरुप का देता? असा सवाल त्यांनी केला.
त्यावर चर्चा करू नये
अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी तुम्हाला अफेडेव्हिट लिहून देऊ की कपाळाला झेंडा लावून फिरू, असं अजितदादांनी पत्रकारांना सांगितलं आहे. त्यांनीच उत्तर देऊन हा विषय क्लोज केला आहे. इतरांनी आता त्यावर चर्चा करू नये, असं ते म्हणाले.
ते पवारांचं कर्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीच अलबेल नसल्याची चर्चा आहे. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आमदारांशी फोनवरून चर्चा केल्याचं सांगितलं जातं. त्यावर गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार हे पक्षप्रमुख आहेत. आपल्या पक्षात कोणी नाराज आहे का? काही कमी आहे का? हे पाहण्याची जबाबदारी पक्षप्रमुखांची असते. त्यामुळे एखादी अफवा आली असेल तर खातरजमा करणे हे प्रत्येक नेत्याचे काम असते, ते पवारांनी केलं असेल. पवार साहेब काही वेगळं करत नाही. ते त्यांचं कर्तव्य आहे, असंही ते म्हणाले.
शिंदेच मुख्यमंत्री राहणार
सरकार जाणार की राहणार? यावर कोण काय बोलतं याने फरक पडत नाही. शिवसेना आणि भाजपकडे बहुमत आहे. 16 आमदार जरी अपात्र ठरले तरी 150 आमदार आमच्याकडे आहेत. त्यामुळे शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, असा दावा त्यांनी केला.