Udhav Thackeray : आता फक्त बुद्धीबळ चालतं, विरोधी पक्ष नेत्यांसोबतच्या संबंध, संवादावर उद्धव ठाकरेंचं उदाहरणासह उत्तर
विरोधी पक्षांसोबतचे संबंध कसे आहेत, या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या स्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली. हे सांगताना त्यांनी बाळासाहेब आणि शरद पवार यांचे राजकीय शत्रुत्व असतानाही कसे संबंध टिकून होते, हे उदाहरण देऊन सांगितले
मुंबईः विरोधी पक्ष नेत्यांचे सध्याचे आरोप आणि एकूण राजकारण (Politics) हे सूडबुद्धीतून सुरु आहे. सध्या वाईट बुद्धी वाढत आहे. पूर्वीच्या काळी असं नव्हतं. विरोधी पक्षांमधील औपचारिक आणि अनौपचारिक संवाद तुटत नव्हता, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं. दै. लोकसत्ता आयोजित संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील उद्योग, विकास प्रकल्पांच्या प्रगतीवर भाष्य केलं. तसंच सध्या महाराष्ट्रात हिंदुत्वावरून (Hindutva) सुरु असलेल्या राजकारणावरही परखड मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी राज ठाकरेंसह देवेंद्र फडणवीस यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला. तसेच महाविकास आघाडी सरकारवर कितीही आरोप केले तरीही हे सरकार भक्कम असून ते निवडणुकीपर्यंत आणि त्यानंतरही ठिकाणार असल्याचा ठाम विश्वास दर्शवला.
‘आता फक्त बुद्धीबळ चालतं’
विरोधी पक्षांसोबतचे संबंध कसे आहेत, या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या स्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली. हे सांगताना त्यांनी बाळासाहेब आणि शरद पवार यांचे राजकीय शत्रुत्व असतानाही कसे संबंध टिकून होते, हे उदाहरण देऊन सांगितले. ते म्हणाले, पवार- ठाकरे यांच्यात मैत्रीचा धागा घट्ट होता. ते एकमेकांवर टीका करत होते. आज मला त्याचा अनुभव येतोय. पण बाळासाहेब घरी पवारांचा उल्लेख करताना ते एकेरी करत नसत. ते शरद बाबू असं म्हणायचे. आता काही लोक एकेरी उल्लेख करतात. मनतभिन्नता समजतो. पण सूडबुद्धीचं राजकारण चाललं आहे. वाईट बुद्धी वाढत आहे. पूर्वी आमचा औपचारिक अनौपचारीक संवाद तुटत नव्हता. पहिली निवडणूक पार्ल्याची निवडणूक तेव्हा भाजप विरोधात होते. शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढली होती. देशात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवल्या असतील. पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जिंकलेली निवडणूक पहिली होती. त्यानंतर अटलजी, प्रमोद गोपीनाथ आले. बाळासाहेब दिल्ली गेले होते एकदा प्रमोदजी गप्पा मारायला संध्याकाळी यायचे. आठवणी होत्या. गप्पा टप्पा होत्या. आता फक्त बुद्धीबळ खेळला जातो, अशी खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
‘बैठकीत त्यांना मस्ती किंवा रुबाब नसतो’
महाविकास आघाडी सरकारची सूत्र शरद पवारांच्या हातात आहे, अशी टीका केली जाते. यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, हे सगळे आरोप खोटे आहेत. मुळात शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात मैत्री होती. त्यामुळे ते बैठकीतही तसेच वडिलधाऱ्याप्रमाणे वागतात. बैठकीत त्यांना मस्ती किंवा रुबाब नसतो. ते येतात. मुद्देसूद गोष्टी मांडतात. आमच्यात काही गोष्टींवर चर्चा होते. निर्णय होतो. आमच्या बैठकांमधलं वातावरण एवढं स्पष्ट असताना आरोप करणाऱ्यांना इतर मुद्दा मिळाला नाही म्हणून असे बोलतात, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.