Kishori Pednekar | भाजप आणि मनसे ठरवून गेम करतंय, पण मुख्यमंत्र्याना कुणीही अडवू शकणार नाही, किशोरी पेडणेकरांचा पलटवार
राज्यात काही पक्षांनी हिंदुत्वाबद्दल आक्रमक भूमिका घेतली असली तरीही नागरिकांनी शांततेनं घ्यावं. एमआयएमने जी भूमिका घेतली ती अगदी योग्य आहे. आमच्या हातून काही घडावं म्हणून खूप प्रयत्न सुरु आहेत. पण शिवसैनिक संयमी आहेत.
मुंबईः मनसे आणि भाजप हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारविरोधात बोलून ठरवून गेम करतायत. वारंवार मुख्यमंत्र्यांवर (CM Uddhav Thackeray) आणि इतर पक्षांवर आरोप केले जात आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी अगदी देशात आणि जगात नाव होईपर्यंत काम करून दाखवलं. महाराष्ट्राचं कौतुक सुरु आहे. हे केवळ सकारात्मक विचार करण्यामुळेच घडलंय. त्यामुळे अशी टीका करणाऱ्यांमुळे शिवसेना आणि महाविकास आघाडीचं काहीही बिघडणार नाही, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दिली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल शरद पवारांवर तीव्र शब्दात टीका केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. मात्र दोन्ही पक्षांनी अशा प्रकारे ठरवून गेम केलाय, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
‘आधी भावावर..आता पवारांवर’
राज ठाकरे यांनी आधी भावावर टीका केली. तेव्हा बॅकफुटवर जावं लागलं. त्यामुळे आता पवारांवर निशाणा साधला, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली. त्या म्हणाल्या, ‘ शिवसेनेनं हनुमान चालिसाला कधीही विरोध केला नाही. मात्र त्याचा आधार घेऊन जे भेसूर चेहरे समोर येत आहेत, ते वाईट आहे. महाराष्ट्रात अनेक प्रश्नांची उकल होण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकारला अनेक दुषणं देत आहेत. हे दोन्ही पक्ष ठरवून गेम करत आहेत. शिवसेनेला कितीही अडचणीत आणण्याचा प्रयत्न करा. आज पहिल्यांदा या महाराष्ट्रात अनेक चांगले मुख्यमंत्रीही होऊन गेले. त्यांनी आपली चांगली कामगिरी करून दाखवली.
बाबरी मशीद कुणी पाडली?
बाबरी मशीद कारसेवकांनी पाडली, असा दावा भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी केला. त्यावर प्रत्युत्तर देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, यासंबंधीचे सगळे रेकॉर्ड्स तपासून पाहिले पाहिजेत. आम्ही स्वतः 27 महिला तिथे गेलो होतो. पण आम्हाला येऊ दिलं नाही. पण बाबरी मशीदीचा घुमट पाडल्यानंतर सगळे सैरभैर झाले. त्यावेळी फक्त हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पुढे झाले आणि त्यांनी कबूल केलं की माझ्या शिवसैनिकांनी मशीद पाडली. तेव्हा काही हे बोलले? त्यावेळी तुमचे वरिष्ठदेखील होते. ते का नाही बोलत?
नागरिकांनी शांततेनं घ्यावं..
राज्यात काही पक्षांनी हिंदुत्वाबद्दल आक्रमक भूमिका घेतली असली तरीही नागरिकांनी शांततेनं घ्यावं. एमआयएमने जी भूमिका घेतली ती अगदी योग्य आहे. आमच्या हातून काही घडावं म्हणून खूप प्रयत्न सुरु आहेत. पण शिवसैनिक संयमी आहेत. शिवसैनिक वयानं आणि विचारानं वाढलाय. तुम्हाला मुंबईत, महाराष्ट्रात दंगे करायचेत. भोंगे डबल-टिबल लावायचेत. लावा.. कायदा आहे. पोलीस आहेत. त्यामुळे भोंगे लावणाऱ्यांनीही विचार करावा. आपली पुढील आयुष्य आपण कोर्टाच्या खेट्या करण्यात घालवणार आहात का? हा विचार करावा, असा सल्ला किशोरी पेडणेकर यांनी दिला.