Mumbai-Thane Election| शिवसेनेत परिवर्तनाचे वारे; अर्ध्या नगरसेवकांच्या उमेदवारीचा पत्ता कट होणार?
शिवसेनेतील अंतर्गत घडामोडीमुळे अनेक विद्यमान नगरसेवकांचे धाबे दणाणले असून, त्यांनी देव पाण्यात ठेवल्याचे समजते.
मुंबईः ऐन मुंबई-ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत परिवर्तनाचे वारे वाहायला लागलेले दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या जवळपास अर्ध्या नगरसेवकांच्या उमेदवारीचा पत्ता कट होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. नेमके कारण काय आहे, चला जाणून घेऊयात या प्रकरणामागची बित्तमबातमी.
शिवसेनेची नवी चाल
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांच्या निवडणुका या वर्षी होणार आहेत. त्यात मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वात लक्षवेधी आहे. कारण मुंबई महापालिकेचे बजेट आणि भारतातील महत्त्वाचे शहर म्हणून असलेली ओळख. या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसलीय. सोबतच सत्ताधारी शिवसेनालाही आपली पकड ढिली होऊ द्यायची नाही. त्यामुळे सत्तेत पुन्हा येण्यासाठी शिवसेनेने नवी चाल खेळली असून, त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर परिवर्तनाचे वारे वाहताना दिसते आहे.
काय आहे नेमके कारण?
मुंबईच्या धरतीवर ठाण्यातही जवळपास अर्धे नगसरेवक तरुण असावेत, असा पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा प्रयत्न आहे. ज्यांचे वय पन्नाशीपार आहे, अशा नगरसेवकांच्या ठिकाणी तरुण रक्ताला वाव देण्याची त्यांची इच्छा आहे. यावरून शिवसेनेत मंथन सुरू आहे. मुंबई आणि ठाण्यात असा प्रयोग होऊ शकतो. मात्र, एखाद्या ठिकाणी तरुण उमेदवार चांगला नसेल, तर त्या ठिकाणी जुन्यांना संधी मिळू शकते. मात्र, कमीत कमी अर्ध्या जागांवर तरी नव्या रक्ताला वाव देण्याचा विचार आहे. तसा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात येणार आहे. त्यांच्या संमतीनंतर हा निर्णय होण्याची शक्यता आहे.
अनेकांचे देव पाण्यात
मुंबई-ठाण्यात हा निर्णय झाला, तर पुढे महाराष्ट्रातील इतर ठिकाणीही त्याची चाचपणी होऊ शकते. तरुण रक्ताला वाव मिळू शकतो. काहीही होवो. महापालिका निवडणूक फेब्रुवारी ते मे महिन्यात कधीही लागू शकते. हे ध्यानात घेता अनेकांनी तयारी सुरू आहे. बऱ्याच जणांनी प्रचारावरही भर दिलाय. मात्र, या नव्या खेळीमुळे अनेक विद्यमान नगरसेवकांचे धाबे दणाणले असून, त्यांनी देव पाण्यात ठेवल्याचे समजते.
मुंबईतील पक्षीय बलाबल
शिवसेना – 97 भाजप – 83 काँग्रेस – 29 राष्ट्रवादी – 8 समाजवादी पक्ष – 6 मनसे – 1 एमआयएम – 1 अभासे – 1
ठाण्यातील पक्षीय बलाबल
शिवसेना – 67 राष्ट्रवादी – 34 भाजप – 23 काँग्रेस – 3 एमआयएम – 2 अपक्ष – 2
इतर बातम्याः
Medical Exam| कोरोनामुळे मेडिकलच्या परीक्षा पुढे ढकलल्या; कधीपासून होणार पेपर?
Sahitya Sammelan|साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर; उदगीरमध्ये कन्नड, उर्दू, तेलगूचाही होणार सन्मान…!
Nashik Train| नाशिक रेल्वे मार्गावरच्या 10 गाड्या आज रद्द; प्रवाशांचे पुन्हा बेहाल!