एसटी बँकेच्या 12 संचालकांचा एकनाथ शिंदेंच्या पावलावर पाऊल, थेट वेगळा गट, राजकारण कुठपर्यंत जाणार?
एसटी बँकेच्या 12 संचालकांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरु असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. या 12 संचालकांनी राजीनामा दिलेला नाही, तर त्यांचा वेगळा गट तयार केला आहे. या संचालकांच्या गटाने गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात बंड पुकारलं आहे.
गिरीश गायकवाड, Tv9 मराठी, मुंबई | 26 डिसेंबर 2023 : एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये वरिष्ठ पातळीवर मोठ्या हालचाली घडत आहेत. बँकेच्या संचालक मंडळात महाभूकंप आल्याचं चित्र आहे. काही महिन्यांपूर्वी बँकेची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनेलने सर्व 19 जागांवर बाजी मारली होती. त्यामुळे सदावर्ते यांच्या पॅनलने बँकेत एकहाती सत्ता मिळवली होती. पण त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्यामुळे सत्ताधारी संचालकांमध्ये सदावर्ते यांच्याविरोधात नाराजी निर्माण झाली. या नाराजीतून 19 पैकी 12 संचालक हे आपल्या संचालकपदाचा राजीनामा देणार अशी चर्चा सुरु झाली. विशेष म्हणजे या सर्व संचालकांशी गेल्या काही दिवसांपासून संपर्क होऊ शकत नव्हता. ते नॉट रिचेबल होते. त्यानंतर आज अचानक हे संचालक मुंबईत दाखल झाले. या संचालकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाचं पॅटर्न वापरल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत मोठं बंड पुकारलं होतं. त्यांच्या नेतृत्वात शिवसेना आमदारांच्या एका मोठ्या गटाने सत्तेतून बाहेर पडत वेगळा मार्ग अवलंबला होता. त्यांनी नंतर भाजपशी युती करुन राज्यात सत्तांतर घडवून आणलं होतं. आता तसाच पॅटर्न एसटी स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेत बघायला मिळतोय. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वातील पॅनलच्या 19 पैकी 12 संचालकांनी वेगळा गट तयार केल्याने खळबळ उडाली आहे.
12 संचालकांची नेमकी भूमिका काय?
वेगळा गट निर्माण केलेले सर्व 12 संचालक 27 दिवसांनी मुंबईत दाखल झाले. त्यांनी आज एसटीमध्ये कार्यरत असलेले उपमहाव्यवस्थापक किशोर अहिर यांची भेट घेतली. कायदेशीर अभ्यास करण्यासाठी एवढे दिवस संपर्कात नसल्याची माहिती या संचालकांनी दिली. यापुढे बँक वाचवण्यासाठी सदावर्तेंसोबत नाही तर स्वतःच काम करणार, अशी भूमिका या संचालकांनी घेतली आहे. तसेच आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर ते राजीनाम्याच्या तयारीत आहेत.
गुणरत्न सदावर्ते यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का
12 संचालकांनी वेगळा गट निर्माण केल्याने गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. विशेष म्हणजे एसटी बँकेत तब्बल 450 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप या संचालकांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.