अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात तब्बल साडेसात तास पंचनामा, अभिषेक घोसाळकर यांच्या शरीरात मिळाल्या दोन गोळ्या
Abhishek Ghosalkar Shot Dead | पोलिसांनी मॉरिस भाईच्या कार्यालयात रात्री ९ पासून ते पहाटे ४.३० पर्यंत पंचनामा करत संपूर्ण पुराव्यांचे संकलन केले. जवळपास ७.३० तास चाललेल्या या पंचनाम्यात पोलिसांना एक पिस्तूल, जिवंत काडतुस आणि सीसीटिव्ही फुटेज हस्तगत केले.
ऋतिक गणकवार, मुंबई, दि. 9 फेब्रुवारी 2024 | दहीसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. मॉरिसभाई नावाच्या व्यक्तीने हा गोळीबार केला. मॉरिसभाई याने अभिषेक घोसाळकर यांचा खून करत स्वतःही आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना दहिसर येथील आयसी कॉलनीतील मॉरिस भाईच्या कार्यालयात गुरुवारी घडली. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
पोलिसांचा तब्बल साडे साततास पंचनामा
पोलिसांनी मॉरिस भाईच्या कार्यालयात गुरुवारी रात्री ९ पासून ते शुक्रवारी पहाटे ४.३० पर्यंत पंचनामा केला. यावेळी पोलिसांनी संपूर्ण पुराव्यांचे संकलन केले. जवळपास ७.३० तास चाललेल्या या पंचनाम्यात पोलिसांना एक पिस्तूल, जिवंत काडतुस आणि सीसीटिव्ही फुटेज हस्तगत केले. तसेच या प्रकरणाला राजकीय वळण असल्याने या प्रकरणाचा तपास बारकाईने केला जात आहे.
शरीरात दोन गोळ्या
अभिषेक घोसाळकर यांच्या बॉडीमध्ये २ बुलेट मिळाल्या. या प्रकरणात मुंबई पोलीस मेहुल नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. कारण घटनेच्या वेळेस मेहुल त्याठिकाणी हजर होता. पोलिसांकडून रात्री ९ वाजेपासून सुरु असलेल्या पंचनामा ४.३० पर्यंत संपला. पोलिसांनी घटनास्थळी एक गण, काही बुलेट्स मिळवल्या आहेत. सकाळी ४.३० वाजेला पंचनामा संपल्यानंतर MHB कॉलनी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
सीसीटीव्हीची तपासणी
मृत आरोपी मॉरिस भाई याच्या कार्यालयाबाहेर असलेल्या सीसीटिव्हीच्या द्वारे पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला. तसेच येथे काही उपस्थित असलेल्या व्यक्तींकडून मृत मॉरिस आणि मृत अभिषेक यांच्या संदर्भातील जबाब नोंदवण्यात आले. सहपोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी हे दहिसर येथील मॉरिस भाईच्या कार्यालयात दाखल झाले. त्यांनी गोळीबारच्या घटनास्थळाची पाहणी केली. अधिकाऱ्यांना पंचनाम्याबाबत सूचना केल्या.
फेसबूक लाईव्ह दरम्यान अभिषेक घोसाळकर उठत होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते. ते मोबाइलकडे पाहत असतानाच त्यांना अत्यंत जवळून चार गोळ्या मारण्यात आल्या. त्यांच्या पोटावर गोळ्या लागल्या. गोळी लागताच त्यांनी पोटाला हात लावला आणि मोबाइल खुर्चीवर ठेवून त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला.