बेस्टच्या बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात, बसच्या धडकेत पोलीस निरीक्षकाचा मृत्यू
कर्तव्य बजावण्यासाठी जात असताना बेस्टच्या बसने मागून धडक दिल्याने पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मुंबई : मुंबईतील मॉर्डन स्कूल बस स्टॉप जवळ बेस्टच्या धडकेत पोलीस निरीक्षक प्रवीण दिनकर यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळी आठच्या दरम्यान वाकोला मस्जिद मॉडन स्कूल बस स्टॉप जवळ बेस्टची बस उभी होती. या बसच्या पाठीमागून पोलीस निरीक्षक प्रवीण दिनकर कर्तव्यासाठी कोळे कल्याण वरून मरीन ड्राईव्ह येथे जात असताना पाठीमागून येणाऱ्या एका बसने धडक दिली. बेस्टच्या बसचा ब्रेकफेल झाल्याने बसवरील नियंत्रण सुटलं.
बसने दिलेल्या धडकेत पोलीस निरीक्षक प्रवीण दिनकर गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालय दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा दुर्वैवी मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक प्रवीण दिनकर हे मरीन ड्राईव्ह येथे पोलीस वाहतूक विभागामध्ये कार्यरत होते.