महाराष्ट्राच्या राजकारणात आज खरंच राजकीय भूकंप? चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा खरा ठरला?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दावा केल्यानंतर आज भाजपात अनेकांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. बावनकुळे यांनी या पक्षप्रवेशामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येईल, असा दावा केलेला.
मुंबई : महाराष्ट्रात 14 तारखेला मोठा राजकीय भूकंप येईल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेला. त्यांच्या या दाव्यानुसार आज भाजपात महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे पश्चिम विदर्भात आज काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. वाशिमचे काँग्रेसचे माजी मंत्री आणि खासदार अनंतराव देशमुख, काँग्रेस नेते नकुल देशमुख, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार, शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप यांच्यासह अनेक इतर पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आगामी काळात भाजपात आणखी मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश होतील, असा सूचक इशारा दिला. “अनंतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली साडे 700 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अमृता पवार, तानुशा घोलप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2024 मध्ये निवडणूक येईल तेव्हा अजून काही पक्षप्रवेश होतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक नंबर जोडी आहे. आजचे प्रवेश तोलामोलाचे आहेत. भाजपने शिवसेनेच्या आमदार-खासदार यांना निवडून आणण्यासाठी काम केलं आज ते शिंदेंसोबत जात आहेत”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
‘मी खरे पत्ते उघडले नाहीत’
या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी अनंतराव देशमुख यांनी आपली भूमिका मांडली. “मी माझ्या राजकारणाला संजय गांधी यांच्यापासून सुरुवात केली. मी खालच्या पदापासून वरपर्यंत पोहचलो. माझ्याजवळ गेल्या 20 वर्षांपासून कुठलंही पद नाही. माझ्यासोबत 70 हजार लोक आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी मी भाजपमध्ये आलोय. मी खरे पत्ते उघडले नाहीत. वेगवेगळ्या ठिकाणी पदाधिकारी आहेत त्यांचे काम होत नाहीत. ते काम आपण करावीत. वाशिममधून अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये येतील. आम्हाला सांभाळून घ्या”, असं अनंतराव देशमुख म्हणाले.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनीदेखील भूमिका मांडली. “मला आनंद आहे. अनंतराव यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा अशी इच्छा होती ती पूर्ण झाली. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. त्यांनी जी जनता आणि पदाधिकाऱ्यांकरिता पक्षप्रवेश केला त्याला प्राधान्य दिलं जाईल. आपल्याला त्यांच्या अनुभवाचा फायदा मिळेल. अमृता पवार यांच्या मागेही पक्षात यावं म्हणून मागे लागलो होतो. तोही प्रवेश झाला. आधी झाला असता तर अजून फायदा झाला असता. तनुजा घोलप यांच्यामुळे नाशिक जिल्ह्यात याचा फायदा होईल. शाम देशपांडे हे आपलेच होते. मी सर्वांचं स्वागत करतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“प्रवेश होताना खोगीर भरती होते. पण बावनकुळे तुम्ही जनतेतले लोक पक्षात घेत आहात. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रगती होत आहे. त्याचं नेतृत्व करिष्माई आहे. पूर्व भारत आता भाजपमय झाला आहे. सर्वांना सोबत घेऊन विकास करणारे मोदी आहेत. हा विश्वास आहे म्हणून त्यांच्यासोबत येत आहेत. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी अर्थसंकल्प सादर केला आहे. 15 लाख ओबीसी, आदिवासी यांच्यासाठी घरकुल तयार करत आहोत. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत अर्थसंकल्पत केली आहे. बावनकुळे 24 तास पक्षासाठी काम करत आहेत, अशा शब्दांत त्यांनी बावनकुळे यांचं कौतुक केलं.