महाराष्ट्राच्या राजकारणात मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला, काँग्रेस पाठोपाठ राज ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक, कारण…
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बैठकांचा सिलसिला सुरु आहे. काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक सुरु असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बैठकांचा सिलसिला सुरु आहे. काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक सुरु असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक नेमकी का बोलावलीय या मागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण या बैठकीत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांकडे काहीतरी महत्त्वाची भूमिका मांडण्याची शक्यता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे हे आगामी महापालिका आणि इतर महत्त्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते, सरचिटणीस आणि पदाधिऱ्यांची बैठक घेणार आहेत. वांद्रेतील एमआयजी क्लबमध्ये सकाळी साडेदहा वाजता ही बैठक पार पडणार आहे.
काँग्रेसची मॅरेथॉन बैठक
दुसरीकडे काँग्रेसच्या गोटातही बैठकांची सिलसिला सुरु आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक सुरु आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के सी वेणुगोपाल, सचिन पायलट, एच के पाटील या बैठकीत उपस्थित आहेत. तसेच राज्यातील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे नेते देखील या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या भारत जोडो यात्रा आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरु आहे. भारत जोडो यात्रेला दक्षिण भारतातील राज्यांमध्ये उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर ही यात्रा पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात दाखल होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्येही उत्साहाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्याही गोटात बैठक
विशेष म्हणजे मनसे आणि काँग्रेस पक्षापोठापाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटातही बैठका सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी नुकतंच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पक्षाच्या बूथ बांधणीचा आढावा घेतला, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करा, पक्षाची कामे लोकांपर्यंत पोहोचवा, असे आदेश सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.