अजितदादा यांना नव्या वर्षात मोठा धक्का बसणार; कट्टर समर्थक, बडा नेता करणार ‘जय महाराष्ट्र’; ठाकरे गटात…
दोन आठवड्यापूर्वी झालेल्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. त्यामुळे अजितदादा गट राज्यात मुसंडी मारेल अशी चर्चा असतानाच अजितदादा गटालाच गळती लागणार असल्याचे चिन्ह निर्माण झाले आहेत. अजितदादा यांचा कट्टर समर्थक नेताच पक्ष सोडणार आहे.
निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 25 डिसेंबर 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं. त्यांच्यासोबत 44 आमदार आले आणि अजितदादा गटाने सत्तेत सहभाग घेतला. त्यामुळे अजितदादा गटात आगामी काळात मोठी इनकमिंग होईल असा कयास वर्तवला जात होता. पण हा कयास फोल ठरताना दिसत आहे. अजितदादा सत्तेत असूनही त्यांच्याकडे नेते, कार्यकर्ते येण्याचं सोडून आता त्यांनाच नेते सोडून जात असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अजितदादा यांचे एक कट्टर समर्थक नववर्षात अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणार आहेत. अजितदादांचे हे समर्थक ठाकरे गटात जाणार असून त्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली आहे.
अजित पवार गटाला नव्या वर्षात ठाकरे गटाकडून जोरदार झटका मिळणार आहे. अजितदादांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन पक्षात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं आहे. उद्धव ठाकरे यांनीही संजोग यांचं जंगी स्वागत केलं आहे. त्यामुळे अजितदादा यांच्यासाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.
माजी महापौर ते शहराध्यक्ष
संजोग वाघेरे ही पिंपरी चिंचवडमधील मोठं नाव आहे. वाघेरे यांनी पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. शिवाय ते अजितदादांचे खास आणि विश्वासू म्हणून ओळखले जातात. आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत वाघेरे यांनी बैठक केली. यावेळी त्यांनी आपण मावळ लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचं उद्धव ठाकरे यांना सांगितलं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी दोन चार दिवसात विचार करून निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलं.
नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात
उद्धव ठाकरे यांनी वाघेरे यांना कोणतंही ठोस आश्वासन दिलेलं नाही. मात्र, वाघेरे यांना मावळची उमेदवारी देण्यास उद्धव ठाकरे अनुकूल असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच वाघेरे हे नव्या वर्षात म्हणजे जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात आलं.
दोनदा तिकीट नाकारलं
वाघेरे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघासाठी दोन वेळेस तयारी केली होती. मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही. अजितदादा यांच्या खास मर्जीतील असूनही तिकीट न मिळाल्याने वाघेरे नाराज असल्याचं सांगितलं जात होतं. आताही अजितदादा गट वेगळा झाल्यानंतर मावळमधून उमेदवारी मिळणं शक्य नसल्याने वाघेरे यांनी अजितदादा यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.
म्हणून गेले असतील
दरम्यान, संजोग वाघेरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राजकारणात प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाची भेट घेत असतो. अशातच निवडणुका आल्या की इच्छुक उमेदवार तिकिटासाठी चाचपणी करतात. आता काहींना खासदार व्हायचं आहे. त्यामुळं संजोग वाघेरे आणि उद्धव ठाकरेंचा फोटो पाहिलेला आहे. ते इथे आल्यावर मी त्यांना विचारेन, मात्र प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु यातून असं दिसतं की मविआकडे उमेदवार नाही, त्यामुळं ते आमचा उमेदवार घेण्याचा प्रयत्न सुरू आहे का? याची मला कल्पना नाही, असा टोला अजित पवार यांनी लगावला.