मोठी बातमी ! तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे? अजितदादा यांचा थेट मुख्यमंत्र्यांनाच सवाल; महायुतीत वादाची महाठिणगी?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यातील मृत्यू प्रकरणावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच जाब विचारल्याचं वृत्त आहे. उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचं राज्यातील हे पहिलंच प्रकरण असल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबई | 20 ऑगस्ट 2023 : भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गटाने मिळून तयार झालेल्या महायुतीत वादाची महाठिणगी पडल्याचं वृत्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील एका रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले आहेत. अजितदादा यांनी थेट एकनाथ शिंदे यांनाच तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे? असा सवाल केल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. अजितदादा यांनी जाब विचारताच एकनाथ शिंदे यांनी त्यांना उत्तर दिलं. वादाची ठिणगी पडल्याचं दिसताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा विषय थांबल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
शुक्रवारी मंत्र्यांची एक खासगी बैठक पार पडली. यावेळी सर्वच मंत्री उपस्थित होते. राज्यातील विविध प्रश्न, योजना आणि निर्णयावर चर्चा सुरू होती. त्याचवेळी ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्यूंचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला. तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे? असा सवाल अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच विचारला. घटना गंभीर आहे. काळजी घेतली पाहिजे, असंही अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले.
मंत्री अवाक्
अजितदादांनी थेट राज्याच्या प्रमुखालाच जाब विचारल्याने बैठकीला उपस्थित असलेले सर्वच मंत्री अवाक् झाले. अनेकांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. अजितदादांच्या या अनपेक्षित सवालामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही आश्चर्य वाटलं. मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना ठाण्याच्या रुग्णालयात झालेल्या घटनेची संपूर्ण माहिती दिली. रुग्णांचा मृत्यू कसा झाला? किती रुग्णांची प्रकृती कशी गंभीर होती, शेवटच्या क्षणी रुग्णालयात किती रुग्ण आले? रुग्णालयावर येणारा ताण आदीची माहितीही शिंदे यांनी अजितदादांना दिल्याचं सूत्रांना सांगितलं.
फडणवीस यांची मध्यस्थी
या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. वाद वाढण्याची आणि बैठकीत शाब्दिक चकमक होण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर फडणवीस यांनीच मध्यस्थी केली. आणि वेगळा विषय काढून ठाण्याच्या विषयाला बगल दिली. त्यामुळे मोठा वाद टळल्याचं सूत्रांनी सांगितलं.
शिंदे गट अस्वस्थ
दरम्यान, अजितदादा यांच्या या सवालामुळे शिंदे गटातील आमदार अस्वस्थ झाले आहेत. अजितदादा महाविकास आघाडीत असतानाही अडचण होती आणि आताही अडचणच आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते खासगीत देत आहेत.