Amruta Fadnavis: नाहीतर मी कुणाच्या बापाला घाबरत नाही; अमृता फडणवीसांनी ट्रोलर्सला असं का सुनावलं?
Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांनी ट्रोलर्सला सुनावताना त्यांचे आभारही मानले आहेत.
मुंबई: आपल्या ट्विटमुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस (amruta fadnavis) आता आणखी एका ट्विटने चर्चेत आल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी यावेळी चक्क एका ट्रोलर्सला झापलं आहे. त्यांनी काही ट्विट्स डिलीट केले होते. त्यावरून एका ट्रोलर्सने त्यांना प्रश्न केला. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी रोखठोक विधान केलं आहे. “मी जे काही ट्वीट डिलीट केले असतील, ते देवेंद्र फडणवीसांच्या (devendra fadnavis) म्हणण्यावरून केले. नाहीतर मी कुणाच्या बापाला घाबरत नाही”, अशा शब्दात त्यांनी ट्रोलर्सला सुनावले आहे. त्यामुळे अमृता फडणवीस यांच्या या ट्विटची चांगलीच चर्चा होत आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना ट्विट का डिलीट करायला लावले याचाही जोरदार चर्चा सुरू आहे. अमृता फडणवीस या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि शिवसेनेवर सातत्याने टीका करत असतात. ट्विटरवरून त्या नेहमीच भाष्य करतात. तसेच मीडियाशीही संवाद साधताना त्यांचा शिवसेनेवर कायम निशाणा असतो.
अमृता फडणवीस यांनी ट्रोलर्सला सुनावताना त्यांचे आभारही मानले आहेत. शिवाय ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. “त्रिशंकू सरकारच्या ट्रोलर्सला नक्की धन्यवाद देईन की त्यांच्या ट्रोलिंगमुळे माझ्या स्त्रीशक्तीचा जागर झाला. मी असेच स्वत:चे विचार व्यक्त करत राहीन आणि तुम्ही असेच ट्रोल करत राहा अशी विनंती करेन”, असं त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
एबीपी माझ्याच्या एका कार्यक्रमात त्यांनी ट्रोलर्सला उत्तर दिलं. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी ट्रोलिंगवर पहिल्यांदाच भाष्य केलं. तसेच ट्रोलिंगमुळे आपल्याला कधी कधी दु:ख होत असल्याचंही सांगितलं. मला ट्रोल केलं जातं तेव्हा मला कधी कधी दु:ख होतं. अमृता यांना मात्र ट्रोलिंगने काही फरक पडत नाहीत. त्या घाबरत नाहीत. फार झालं आता हे मलाच त्यांना कधी कधी सांगावं लागतं. त्यांची सगळी मतं मला पटत नाही. त्यांनी राजकीय ट्विट करू नये अशी माझी अपेक्षा असते. पण शेवटी त्यांची मतं ही त्यांची आहेत. त्यासाठी तिला कधीतरी ट्रोलिंग सहन करावं लागतं. माहितीतील लोकही ट्रोल करतात तेव्हा मला दु:ख होतं. शिवसेना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ट्रोलिंग करत असतात. ती मंडळी घाणेरडे चेहरे लावून ट्वीट करतात. तेव्हा वाटतं आपण कुठे चाललो आहोत?, अशी सल देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली होती. त्यावर बोलताना अमृता फडणवीस यांनी ट्रोलर्सला झापलं होतं.