मनसेला सेनेशी पंगा महागात, बीएमसीतल्या ऑफिसला टाळं
विनायक डावरुंग, टीव्ही 9 मराठी, मुंबई : शिवसेनेसोबत घेतलेला पंगा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महागात पडला आहे. कारण मुंबई महापालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत पालिकेतील मनसेच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला गेला आहे. मनसेने शिवाजी पार्कच्या जिमखान्याच्या जागेवर महापौरांचा बंगला बांधण्यास विरोध केल्यानंतर शिवसेना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच मनसेच्या कार्यलायाला टाळे ठोकण्यासाठी हालचाली वेगवान झाल्याचे बोलले […]
विनायक डावरुंग, टीव्ही 9 मराठी, मुंबई : शिवसेनेसोबत घेतलेला पंगा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महागात पडला आहे. कारण मुंबई महापालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत पालिकेतील मनसेच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला गेला आहे. मनसेने शिवाजी पार्कच्या जिमखान्याच्या जागेवर महापौरांचा बंगला बांधण्यास विरोध केल्यानंतर शिवसेना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच मनसेच्या कार्यलायाला टाळे ठोकण्यासाठी हालचाली वेगवान झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता शिवेसना आणि मनसेतील वातावरण पुन्हा तापणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मनसेचा मुंबई पालिकेत एकच नगरसेवक आहे. त्यामुळे त्यांचा कोणताही गट नाही. पर्यायाने, मनसेला कार्यालय नाकारण्यात आलं आहे. कारण महापालिकेच्या नियमानुसार, कमीतकमी 5 नगरसेवक असलेल्या पक्षाला गटनेते हे पद मिळते. तसेच पालिका त्यांना कार्यालयही उपलब्ध करुन देते. तसा नियमच आहे.
मात्र, मनसेकडे आता एकच नगरसेवक राहिल्याने पालिकेने मनसेचे पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यासाठी नोटीस बजावली होती. त्यानंतरही मनसेने पक्ष कार्यालय आपल्या ताब्यात ठेवले होते. यामुळे हे कार्यालय ताब्यात घ्यावे, असा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे मनसेला आपले हे कार्यालय लवकरच रिकामे करावे लागणार आहे.
राज ठाकरे आणि मनसेची कोणती भूमिका शिवसेनेला झोंबली?
काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापौर बंगला आणि फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर मनपा आयुक्त अजॉय मेहता यांची पालिका मुख्यालयात जाऊन भेट घेतली. त्यावेळी महापौर बंगल्यासंदर्भात राज ठाकरेंनी रोखठोक भूमिका घेतली. त्यामुळे शिवसेना आक्रमक झाल्याचे बोलले जात आहे.
राज ठाकरे काल काय म्हणाले होते?
“दादरमधील क्रीडा भवन जागा महापौर बंगल्यासाठी दिली जात आहे, हे कळलं आहे. तर आयुक्तांना सांगितले की, ही जागा कोणत्याही परिस्थितीत महापौर बंगल्याला देणार नाही.”, असे राज ठाकरे म्हणाले.
“बाळासाहेबांनी शिवसेनेचा महापौर बंगल्यात बसवला, आता बंगल्याची जागा काबीज केली गेली. बाळासाहेबांसाठी इतर कुठेही जागा मिळाली असती. पण फक्त आपल्या फायद्यासाठी ही जागा काढून घेतली जात आहे. महापौरांना बंगल्यासाठी इतर फिरावं लागत हे दुर्दैव आहे.” असेही राज ठाकरे म्हणाले.