‘उद्धव ठाकरे आपला पुरुषार्थ काय तर…’, चित्रा वाघ यांची अतिशय खोचक टीका
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. विशेष म्हणजे यावेळी चित्रा वाघ यांनी एक विदुषक आणला होता. हा विदुषक भर पत्रकार परिषदेत नाचत होता.
मुंबई | 12 सप्टेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना टरबुज्या असा उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांची ही टीका भाजप नेत्यांच्या प्रचंड जिव्हारी लागली आहे. त्यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांच्यावर विदूषकासारखी वेळ आली आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या. यावेळी त्यांनी जोकरचे कपडे घातलेल्या एका व्यक्तीला पत्रकार परिषदेत आणलं होतं.
या जोकरला चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत नाचायला लावलं. तसेच या जोकरने आपल्यासोबत आणलेल्या पाटीवर उद्धव ठाकरे, मातोश्री असं लिहिलं होतं. तसेच आपण उद्धव ठाकरे यांना जोकरचा ड्रेस पाठवणार आहोत. कारण उद्धव ठाकरे हे आता करमणुकीपुरता राहीले आहेत, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.
ठाकर गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना वेस्ट इंडिजचा खेळाडू आहेत, असं म्हणत टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं. भास्कर जाधव हे जोकर आहेत. त्यांचं गणपतीसोबत विसर्जन करायला हवं, अशा कठोर शब्दांत चित्रा वाघ यांनी टीका केली.
‘ना घर का, ना घाट का अशी उद्धव ठाकरेंची अवस्था’
“स्वतःच्या सडलेल्या बुद्धीचा भोपळा बाहेर आणण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलंय. ना घर का, ना घाट का, अशी अवस्था उद्धव ठाकरे यांची झालीय. विदूषकांची टोळी राज्यात फिरतेय. यात पहिला विदूषक खासदार संजय राऊत, दुसरा विदूषक भास्कर जाधव आणि तिसरा विदूषक उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरेंकडे दुसरे काम उरलं नाही, म्हणून ते करमणूक करत आहेत”, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला.
‘उद्धव ठाकरे आपला पुरुषार्थ काय तर…’
“उद्धव ठाकरे कधी तरी शुभ बोला. राम मंदिर बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आहे. उद्धव ठाकरे यांना त्यात गोध्रा दिसते. उद्धव ठाकरे आधी हिंदू विरोधी झाले. आता रामाबद्दल देखील ते बोलत आहेत. भाजप सरकारने कलम 370 हटवून दाखवलं हा पुरुषार्थ आहे. उद्धव ठाकरे आपला पुरुषार्थ काय तर कोविड काळात भ्रष्टाचार, पत्राचाळ घोटाळा यात आहे”, अशी खोचक टीका चित्रा वाघ यांनी केली.
“उद्धव ठाकरे तुम्ही जोकर झालात. विदूषक झालात. भास्कर जाधव यांना माहिती आहे, आपली कारकीर्द केव्हाही संपू शकते म्हणून ते विदूषक आहेत. भास्कर जाधव तुमचे तर गणपतीसोबत विसर्जन करायला हवं. उद्धव ठाकरे यांना विदुषकांचा वेढा आहे. उद्धव ठाकरे यांना आम्ही जोकरच ड्रेस पाठवत आहोत. उद्धव ठाकरे यांना आता आपण करमणुकीपुरते राहिलो असे वाटलं पाहिजे म्हणून हा जोकरचा ड्रेस आम्ही देतोय”, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.
“आमच्या नेत्यांच्या नादी लागू नका. तुम्ही आमच्या नेत्यांवर बोलाल पण यापेक्षा कडक उत्तर देऊ”, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला. तसेच “जोकरची स्वतःची नक्कल नसते. त्याला नाचवले जाते”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.