BIG BREAKING | आशिष शेलार शरद पवार यांच्या भेटीला, पडद्यामागे काय घडतंय?
भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि बडे नेते आशिष शेलार हे आज अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी निघाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. पण ही भेट नेमकी वेगळ्या कारणासाठी झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि बडे नेते आशिष शेलार हे आज अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी निघाले आहेत. आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जात भेट घेतली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मोट बांधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे भाजप नेते आशिष शेलार त्यांच्या भेटीसाठी गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. असं असलं तरी ही राजकीय भेट नसल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील आगामी वर्ल्ड कप, त्यातील वानखेडे स्टेडियमवर होणारे सामने, शिवाय एमसीएचे काही मुद्दे यांवर चर्चा करण्यासाठी आशिष शेलार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नुकतीच ईडीकडून साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी संबंधित ठिकाणी देखील छापेमारी झाली. या दरम्यानच्या काळात शरद पवार यांनी अचानक अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पण नंतर कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या आग्रहानंतर शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला.
अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी आपल्याला दोन वर्षांपूर्वी भाजप प्रवेशाची ऑफर आली होती. ती ऑफर स्वीकारली असती तर राज्यात तेव्हात महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं असतं. पण आपण आपल्या विचारांशी प्रतारणा केली नाही, असा गौप्यस्फोट केलाय. तर भाजपच्या मशिनमध्ये पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचे सर्व आरोप धुवून निघतात, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलीय.
अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चा
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. सलग दोन दिवस ही चर्चा रंगली. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत सर्व चर्चांचं खंडन केलं होतं. असं सगळं घडलेलं असताना आता आशिष शेलार यांनी आज शरद पवार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे खरंच काहीतरी घडत नाहीय ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.
शरद पवार यांची भाजपवर सातत्याने टीका
या सगळ्या घडामोडी घडत असताना शरद पवार यांच्याकडून सातत्याने भाजपवर निशाणा साधला जातोय. भाजपकडून तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप शरद पवार यांच्याकडून केला जातोय. याशिवाय देशात हुकूमशाही सुरु असल्याचीदेखील टीका शरद पवारांनी याआधी केली आहे.