BMC Budget 2022: सर्वांना पाणी, घराशेजारीच आरोग्य केंद्र, कचरा करणाऱ्यांकडून ‘वापरकर्ता शुल्क’ आकारणार; निवडणुकीच्या तोंडावर पालिकेचा अर्थसंकल्प जाहीर
BMC Budget 2022 मुंबई महापालिकेचा 2022-2023 या आर्थिक वर्षसााठीचा अर्थसंकल्प (bmc budget) सादर करण्यात आला आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (iqbal singh chahal) यांनी 45 हजार 949 कोटींचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे.
मुंबई: मुंबई महापालिकेचा 2022-2023 या आर्थिक वर्षसााठीचा अर्थसंकल्प (bmc budget) सादर करण्यात आला आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (iqbal singh chahal) यांनी 45 हजार 949 कोटींचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात 17.70 टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी 39 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. महापालिका निवडणुका (bmc election) होऊ घातल्याने निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पातून मुंबईकरांचा आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे. या अर्थसंकल्पातून सर्वांसाठी पाणी हे धोरण जाहीर करण्यात आलं आहे. तसेच घराशेजारीच आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. मात्र, मुंबईत कचरा करणाऱ्यांकडून वापरकर्ता शुल्क आकारण्यात येणार असल्याची घोषणा या अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज सकाळी सव्वा अकरा वाजता पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे हा अर्थसंकल्प सादर केला. यंदाचा महापालिकेचा अर्थसंकल्प 45 हजार 949 कोटींचा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात 17.70 टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प वाढला असला तरी पालिकेच्या तिजोरीला मात्र गळती लागल्याचं दिसून आलं आहे. अर्थसंकल्पातून महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट दर्शवण्यात आली आहे.
सर्वांसाठी पाणी
निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेने सर्वांसाठी पाणी हे नवे धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी सत्ताधारी शिवसेनेनं मुंबईकरांना 24 तास पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र याचा केवळ प्रायोगिक प्रकल्प मुलुंड वांद्रे पश्चिममध्ये सुरु करण्यात आला. नंतर तो बंद पडला होता. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पातून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
मालमत्ता कर घटला
मालमत्ता करातून मिळणारं महापालिकेचं उत्पन्न 7000 कोटींवरुन 4800 कोटी इतकं सुधारित करण्यात आलं आहे. 500 चौरस फुटांखालील घरांना मालमत्ता करातून 100 % सूट देण्यात आली आहे. ही सूट मिळालेल्या नागरिकांची संख्या 16,14,000 एवढी असून सवलतीची रक्कम 462 कोटी इतकी दाखवण्यात आली आहे. बेस्ट उपक्रमाला अर्थसहाय्यापोटी 800 कोटी रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तर गोरेगाव-मुलुंड लिंकरोड साठी 1300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
केला कचरा की भर दंड
महापालिकेने निवडणूकीच्या तोंडावर मुंबईकरांसाठी नव्या `वापरकर्ता शुल्काची´ घोषणा केली आहे. त्यामुळे आता कचरा निर्मिती करणाऱ्यांना वापरकर्ता शुल्क भरावे लागणार आहे. या वापरकर्ता शुल्कातून वर्षाला 174 कोटी रुपये मिळण्याचं टार्गेट महापालिकेने ठेवलं आहे. मुंबईतील 3500 उपहारगृहांनाही आता कचऱ्या निर्मिती केल्यास वापरकर्ता शुल्क भरावं लागणार आहे. या सर्व उपहारगृहातून येणाऱ्या 300 टन ओल्या कचऱ्यावर महापालिकेला 26 कोटींचं वापरकर्ता शुल्क मिळणार आहे,
200 आरोग्य केंद्र
गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या आरोग्यावर भरीव 2660 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आपल्या घराशेजारी आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. मुंबईत 200 हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण 400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
शिवयोग केंद्र उभारणार
शिवयोग केंद्र आता मुंबईत असणार आहे. केंद्राच्या या योजनेचं शिवसेनेने नामकरण करून ही योजना मुंबईत राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने मुंबईत 200 शिवयोग केंद्र स्थापन केली जाणार आहेत. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 30 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
अनधिकृत बांधकांना दुप्पट दंड
महापालिकेच्या तिजोरीला गळती लागल्याने महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी महापालिकेने नवीन मार्ग अवलंबले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अनधिकृत बांधकामांना ज्यादा दंड आकरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता अनधिकृत बांधकाम आढळल्यास मालमत्ता कराच्या दोन पट दंड आकारणी करण्यात येणार आहे. उत्पन्नवाढीसाठी मुंबईत डिजीटल जाहिरातींच्या माध्यमांना परवानगी दिली जाणार आहे. यातून अतिरीक्त उत्पन्न मिळवण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.
संबंधित बातम्या:
BMC BUDGET: मुंबई महापालिकेचा डिजीटल शिक्षणावर भर, विद्यार्थ्यांना मसूरडाळ, हरभरे आणि तांदूळही देणार
Parambir Singh: आरोपी बचावासाठी इतरांची नावं घेत असतो, राऊतांनी परमबीर सिंगांचे आरोप फेटाळले