ईडी अधिकाऱ्यांनी काय-काय प्रश्न विचारले? सगल 4 तासांच्या चौकशीनंतर BMC आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची ईडीकडून (ED) तब्बल चार तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर इक्बाल सिंह चहल यांनी प्रसारमाध्यमांना सविस्तर प्रतिक्रिया दिली
मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरुन (Shikshak-Padvidhar Election) महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना वेग आलेला असताना मुंबईतही एक महत्त्वाची घडामोड घडलीय. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची ईडीकडून (ED) सलग तब्बल चार तास चौकशी करण्यात आलीय. ईडी चौकशीनंतर इक्बाल सिंह चहल यांनी प्रसारमाध्यमांना सविस्तर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपल्याला नेमकं कशासाठी बोलावलं होतं, नेमकी कशाविषयी तक्रार करण्यात आली होती याविषयी सविस्तर माहिती दिली. दरम्यान, इक्बाल यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स देण्यात आल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. या बातमीमुळे खळबळ उडाली होती.
“जून 2020 मध्ये राज्य शासनाने जम्बो कोव्हिड सेंटरचा निर्णय घेतला होता. कारण मुंबईत कोरोना संकट आलं तेव्हा मुंबईत महापालिकाकडे चार हजारही बेड्स नव्हते. तेव्हा आपल्याकडे 3750 बेड्स होते. मुंबईची लोकसंख्या जवळपास 1 कोटी 40 लाख असताना बेड्सची ही संख्या फार कमी होती. त्यावेळी रिपोर्ट मिळत होता की, लाखो जणांना कोरोनाची लागण होईल. तो अंदाज खरा ठरला”, असं इक्बाल सिंह चहल यांनी सांगितलं.
“मुंबईत तबब्ल 11 लाख जणांना कोरोनाची लागण झाली. तेव्हा राज्य सरकारने मैदानांमध्ये कोव्हिड हॉस्पिटल बांधायचा निर्णय घेतला. दहीसर, मुलूंड, बीकेसी, सायन, मालाड, कांजूरमार्ग या ठिकाणी कोव्हिड हॉस्पिटल बांधण्यात आले. पण इथे मुंबई महापालिकेच्या प्रशासनाने सगळे हॉस्पिटल बांधले नाहीत. या बांधकामात मुंबई महापालिकेचं योगदान शुन्य होतं”, असं इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्ट केलं.
इक्बाल सिंह चहल यांची सविस्तर प्रतिक्रिया
“एकूण दहा जम्बो हॉस्पिटल होते. यापैकी एका जम्बो हॉस्पिटलविषयी मुंबई पोलिकांकडे 2022 मध्ये तक्रार करण्यात आली. याच विषयी चौकशी करण्यासाठी आज बोलवण्यात आलं होतं”, अशी माहिती इक्बाल सिंह चहल यांनी दिली.
“हे जम्बो हॉस्पिटल तयार झाले तेव्हा मॅनपॉवर कुठून आणायचे? असा प्रश्न होता. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने आमच्याकडे माणसं नाहीत, असं सांगितलं. त्यामुळे आम्ही आऊट सोर्सिंग एजन्सीकडून मॅनपॉवर घेण्याचा निर्णय घेतला”, असं चहल यांनी सांगितलं.
“मशिन, औषधी सगळे आमचे फक्त मॅनपॉवरसाठी इतर यंत्रणांची मदत घेतली. 17 मार्चला स्थायी समितीने ठराव पास केला की, आता टेंडर न काढता महापालिकेने एक ते दोन दिवसांच्या कोटेशनने कोव्हिड फाईटची तयारी करावी. हे करताना आम्ही कोटेशन काढले नाही”, अशी माहिती चहल यांनी दिली.