मोठी बातमी ! माहीममधील ‘अति’क्रमण हटाव, ‘त्या’ मजारीवर अखेर हातोडा; राज ठाकरे यांनी ठणकावताच अॅक्शन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर अखेर 24 तासाच्या आत माहीम खाडीतील अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलं आहे. पोलीस, पालिका आणि जिल्हाधिकारी प्रशासनाने ही तोडक कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.
अक्षय मंकनी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्कवरील रॅलीतून माहीमच्या खाडीत अनधिकृत मजार बांधल्याचा दावा केला होता. तसेच ही मजार महिन्याभरात न हटवल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही राज ठाकरे यांनी दिला होता. राज ठाकरे यांच्या इशाऱ्याला 24 तास उलटत नाही तोच मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने अखेर हे अतिक्रमण हटवले आहे. खाडीतील मजारच्या जागेवरील हिरवा झेंडा हटवण्यात आला आहे. तसेच अनधिकृत मजारवर जेसीबी मशीन फिरवण्यात आली आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राज ठाकरे यांनी काल इशारा दिल्यानंतर कालच पोलिसांनी संबंधित मजारवर जाऊन पाहणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनीही तात्काळ ते अनधिकृत बांधकाम हटवण्याचे आदेश दिले होते. हे अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी सात जणांचं पथक तयार करण्यात आलं होतं. आज सकाळी 8 वाजता पोलीस, जिल्हाधिकारी प्रशासन आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन ही कारवाई केली. कारवाई करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अर्ध्या तासात मजार तोडली
यावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबी मशीनच्या सहाय्याने अनधिकृत मजार जमीनदोस्त करण्यात आली. सर्वात आधी या मजारीवरील झेंडा हटवण्यात आला. त्यानंतर तोडक कारवाई करण्यात आली. अवघ्या अर्ध्या तासात ही संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणी पुन्हा बांधकाम होऊ नये म्हणून पोलीस आणि पालिकेचा वॉच राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, तोडक कारवाईवेळी कोणताही अडथळा आला नाही. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्क मैदानावर सभा घेतली होती. यावेळी राज ठाकरे यांनी समुद्रात मजार बांधली गेल्याचा दावा केला होता. त्यांनी ड्रोनद्वारे व्हिडीओही दाखवला होता. तसेच पोलिसांना मजारवर कारवाई करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली होती. एक महिन्यात कारवाई केली नाही तर आम्हीही त्याबाजूला गणपतीचं मोठं मंदिर बांधू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले होते. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर अवघ्या 24 तासात मजारवर कारवाई करण्यात आली आहे.