शिवसैनिकांचे राडे सुरूच राहिले तर भाजप कार्यकर्तेही सक्षम, परिणाम भोगावे लागतील; चंद्रकांत पाटलांचा इशारा
शिवसैनिकांचे राडे असेच सुरू राहिले तर भाजप कार्यकर्तेही सक्षम आहेत. शिवसैनिकांना याचे परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला.
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सेनाभवनासमोर झालेल्या राड्यावरुन शिवसेनेला इशारा दिलाय. शिवसैनिकांचे राडे असेच सुरू राहिले तर भाजप कार्यकर्तेही सक्षम आहेत. शिवसैनिकांना याचे परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला. यावेळी त्यांनी आशा सेविकांच्या मुद्द्यावरही भाष्य करत विधिमंडळात सरकारला धारेवर धरणार असल्याचं सांगितलं (Chandrakant Patil warn Shivsena activist over fighting with BJP).
चंद्रकांत पाटील म्हणाले, “आपले राज्य आहे म्हणून शिवसेना कार्यकर्ते राडे करतील, तर त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात त्यांचे सरकार असल्याने शांतता राखण्याची जबाबदारी शिवसेनेची असल्याची जाणीव कार्यकर्त्यांना करून दिली आहे. आता हा विषय संपायला हवा असे आम्हालाही वाटते. तरीही शिवसैनिकांना असाच संघर्ष चालू ठेवायचा असेल तर भाजपाचे कार्यकर्ते सक्षम आहेत.”
“महानगरपालिकांची वॉर्ड रचना करताना शहराच्या विकासाचा विचार करायला हवा. राज्य सरकारने कोणतीही रचना आगामी निवडणुकीत आणली तरी भारतीय जनता पार्टीला फरक पडत नाही. भाजपची संघटनात्मक रचना बळकट आहे,” असंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.
“आशा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी विधिमंडळात सरकारला धारेवर धरू”
आशा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “आशा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन केले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मागण्या ऐकूनही घेतल्या नाहीत. याचा आपण निषेध करतो. विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात भारतीय जनता पार्टी या प्रश्नावर सरकारला धारेवर धरेल.”
“समाजाच्या कोणत्याही घटकाने अन्यायाच्या विरोधात बोलता कामा नये, असे या सरकारचे धोरण आहे. कोणीही आंदोलन केले की लगेच गुन्हे दाखल करायचे, लाठीचार्ज करायचा असे चालू आहे. ज्या आशा कर्मचाऱ्यांनी जिवावर उदार होऊन गेली दीड वर्षे कोरोनाच्या साथीत काम केले त्यांच्या मागण्या उपमुख्यमंत्र्यांनी गाडीत बसून ऐकून तरी घ्यायला हव्या होत्या. पण ‘हम करे सो कायदा’, असे चालू आहे, याचा आपण निषेध करतो. विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात या प्रश्नावर भाजपा सरकारला धारेवर धरेल,” अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली.
हेही वाचा :
पुणे भाजपही पंतप्रधान मोदींचा प्रॉपर्टी विकण्याचा वारसा जपतोय, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांची टीका
देशविरोधी शक्तींच्या सुरात सूर मिसळू नका; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा
तुम्ही वाट्टेल ते लिहिणार त्यावर रोषही व्यक्त करायचा नाही का?; ही दंडुकेशाही चालणार नाही: चंद्रकांत पाटील
व्हिडीओ पाहा :
Chandrakant Patil warn Shivsena activist over fighting with BJP