‘कोस्टल’च्या घोटाळ्यावरून स्थायी समितीत रणकंदन; भाजपने घाईघाईने 840 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्याचा डाव उधळला
भाजप नेते आशिष शेलार यांनी काल कोस्टल रोड प्रकल्पात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्याचे आज स्थायी समितीत पडसाद उमटले.
मुंबई: भाजप नेते आशिष शेलार यांनी काल कोस्टल रोड प्रकल्पात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्याचे आज स्थायी समितीत पडसाद उमटले. भाजपने कोस्टल रोडच्या मुद्द्यावरून सरकारला जोरदार धारेवर धरले. यावेळी स्थायी समितीत 840 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येणार होती. मात्र, हे प्रस्ताव घाईघाईत आणले असून त्यात भ्रष्टाचार झालेला आहे, असा आरोप करत भाजपने हे प्रस्ताव मंजूर करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव उधळून लावला.
सत्ताधारी शिवसेनेने आज स्थायी समितीत तब्बल 840 कोटींचे प्रस्ताव आणले होते. मात्र, सत्ताधाऱ्यांचा हा डाव भारतीय जनता पक्षाने उधळून लावला. या विविध प्रस्तावांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भाजपच्या सदस्यांनी केला. तसेच या प्रस्तावावर बोलूच न दिल्याने भाजपच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सभेत शेवटपर्यंत तीव्र विरोध केला. सदर प्रस्तावात एका कोविड सेंटरसाठी 11 कोटींचे भाडे कश्यासाठी? असा सवाल करत भाजपचे स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचा गळा घोटला
स्थायी समितीच्या एकाचवेळी 840 कोटींचे प्रस्ताव आले असताना यावर चर्चा होऊ न देणे हे लोकशाही प्रक्रियेसाठी घातक आहे. यामध्ये शिवसेनेचा भ्रष्टाचार असून त्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल होईल म्हणून भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना चर्चेपासून प्रतिबंध करण्यात आला. यातून सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचा गळा घोटला आहे. बहुतेक विषय स्थायी समितीत विचारात घ्यायचे नाही(नॉट टेकन) आणि शेवटच्या दिवशी घाईघाईत मंजूर करायचे हा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. एका कोविडच्या भाड्यापोटी 11 कोटी देत असू तर नवीन कोविड सेंटर आपण स्वतः का उभारले नाही? असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला.
650 कोटींचा संशयास्पद गैरव्यवहार
यापूर्वी सागरी किनारा मार्गामध्ये झालेल्या भ्रष्टाचारावर भारतीय जनता पार्टीने आवाज उठवला आहे. यात कन्सल्टंटला 215 कोटी रुपये देण्यावर तसेच कंत्राटदाराला कोणतेही काम न करता 142 कोटी रूपये देण्यावर खुद्द कॅगने ताशेरे ओढले आहेत. हा शिवसेनेचा भ्रष्टाचार असून 10 वर्षे होऊनही आजही किनारा मार्गाचे काम अपूर्ण आहे. यात 650 कोटींचा संशयास्पद गैरव्यवहार झाल्याचा आरोप कॅगने केला आहे. याची उत्तरे सत्ताधाऱ्यांनी द्यावीत. केवळ भ्रष्टाचार लपवण्यासाठी विरोधकांना बोलू द्यायचे नाही या स्थायी समिती अध्यक्षांच्या कृत्याचा भारतीय जनता पक्ष धिक्कार करत आहे, अशी तीव्र प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
आधी रकमेचा आकडा ठरवा
स्थायी समितीत भाजप नगरसेवकांना बोलू दिले जाते. त्यामुळे भाजपचे आरोप चुकीचे आहेत. त्यांना दररोज नवनवीन आरोप करायची सवय लागली आहे. भाजपचे बेशिस्त नेते वाटेल ते बोलत आहेत. शिरसाट 650 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं एकदा म्हणतात, नंतर कोस्टल रोडमध्ये 800 कोटींचा घोटाळा झाला म्हणतात… त्यांना हवे ते आकडे ते सांगत आहेत. त्यांनी वारंवार घोटाळ्याची रक्कम बदलण्यापेक्षा नीट काय ती रक्कम ठरवावी आणि नंतरच आरोप करावेत, असा टोला लगावतानाच कोस्टल रोड हा मुंबईकरांच्या विकासासाठी आहे. त्याला आपण सगळ्यांनी एकत्र मान्यता दिली आहे, असं स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितलं.
Video | Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM | 8 December 2021#News | #NewsUpdate | #HelicopterCrash https://t.co/5MeaNiYScB
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 8, 2021
संबंधित बातम्या:
CDS Bipin Rawat : तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 11 वर, सीडीएस रावत गंभीर जखमी
VIDEO: लष्कराचे हेलिकॉप्टरला कोसळताच भीषण आग, झाडेही कापली; पाहा व्हिडीओंमधून अपघाताची भीषणता
Cabinet Meeting : Omicronसह मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले निर्णय, वाचा सविस्तर