त्यांना जाऊन सांगा भुजबळांना काढा म्हणून, ‘त्या’ प्रश्नावर छगन भुजबळ संतापले; नेमकं काय घडलं?
कॅबिनेटमध्ये फूट आहे की नाही माहीत नाही. मी ओबीसींचं काम 35 वर्षापासून करत आहे. ओबीसींची लढाई लढत राहणार आहे. उद्या पटेल, गुजर आणि जाटही ओबीसीत येतील. अशाच मार्गाने येतील. मग काय करणार? बलाढ्य जातील येतील, असं सांगतानाच लोकशाहीत जे अपेक्षित आहे ती लढाई आम्ही लढणार आहोत. ओबीसींना संपवलं जात आहे म्हणूनच आम्ही ओबीसींच्या हक्कासाठी मैदानात उतरत आहोत, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 29 जानेवारी 2024 : मराठा समाजालाही आता ओबीसींमधून आरक्षण मिळणार असल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ चांगलेच संतापले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात मी एकाकी नाही. देशातील आणि राज्यातील करोडो ओबीसी बांधव माझ्यासोबत आहेत, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. आमच्या आरक्षणात आता बलदंड लोक आले आहेत. ते आमचं आरक्षण घेऊन जातील. आमचं आरक्षण संपुष्टात आलं आहे. हे सांगायला तत्त्वज्ञान मांडायची गरज नाही, असा संतापच भुजबळ यांनी व्यक्त केला.
छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना सरकारमध्ये राहून तुम्ही आरक्षणाची लढाई लढणार की बाहेर पडून आरक्षणाची लढाई लढणार असा सवाल केला. या सवालावर भुजबळ भडकले. ते माझ्या पार्टीने ठरवावं. मुख्यमंत्र्यांनी ठरवावं. मला त्याची काही चिंता नाही. मला ओबीसी प्रश्नाचं दु:ख आणि संताप आहे. त्यापुढे कोणतीही अभिलाषा नाही. त्यांना जाऊ सांगा तुम्हा यांना काढा म्हणून, असा संताप छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
मंत्रिपदाचा संबंधच नाही
तुम्हाला वाटतं का? आम्ही जाणीवपूर्वक आरक्षणावर बोलतोय? आमच्या ओबीसीत बॅकडोअर लोक घुसवले जात आहेत. ते मी जाणीवपूर्वक केलंय का? कोण करतंय हे? त्याचा विचार करा. यात काय पीएचडी करायची गरज आहे? वाटेल त्यांना तुम्ही कुणबी सर्टिफिकेट दिलं जात आहे. चांगलं घर असलं तरी झोपडी दाखवली जात आहे. शिक्षण असलं तरी नाही म्हणून सांगितलं जात आहे. नोकरी असली तरी दाखवली जात नाही. घरासमोर गाडी ट्रॅक्टर असली तरी मोलमजुरी करता म्हणून सांगितलं जात आहे. इथे मंत्रिमंडळाचा हुद्द्याचा कसलाही संबंध नाही. ओबीसी बांधवांचं भटक्यांचं कित्येक वर्षानं मिळणारं आरक्षण समाप्त होतंय याची आग मनात भडकत आहे, असा संतापही छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
आता हजार वाटेकरी झाले
बबनराव तायवाडे यांनी भुजबळ यांना आपला पाठिंबा नसल्याचं म्हटलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. बबनराव तायवाडे यांचं समर्थन नसेल तर नसेल. आमच्यात 374 वाटेकरी होते. विविध जातीचे. आता हजार वाटेकरी झाले. त्यामुळे आमचा वाटा कमी होणार, हे साधं सिंपल आहे. त्यासाठी मोठं तत्वज्ञान मांडायची गरज नाही. ओबीसींच्या 54 टक्क्यात आणखी 20-25 टक्के घुसवले तेही बलंदड. विमुक्त भटके जमातीतील लोक असतील किंवा इतर ओबीसी जाती असतील या सर्वांचं आरक्षण आता बलदंड लोकं घेऊन जाणार आहेत. आमचं आरक्षण संपल्यात जमा आहे असं वाटत आहे. त्यामुळेच मी बोलत आहोत, असंही ते म्हणाले.
मला अभिलाषा नाही
ओबीसींचं आरक्षण संपणार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. फडणवीस भेटतील तेव्हा त्यांना सांगेल. मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या, असं सांगू त्यांना. त्यांना कशाला आमच्यात घुसवत आहात? त्यांना आरक्षण द्यायला सुरुवात झाली, थांबवा. ओबीसींचं आरक्षण जातंय याचं दु:ख आणि संताप आहे. मला कोणतीही अभिलाषा नाही. त्यांना सांगा मला काढून टाका, असंही ते म्हणाले.