BREAKING | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना, वाचा Inside Story
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर खलबतं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीत नेमके निर्णय काय होतात? याकडे राज्याचं लक्ष असणार आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई विमानतळावर गुप्त भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. विशेष म्हणजे शिंदे-फडणवीस यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दिशेला रवाना झाल्याची माहिती समोर आलीय. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामागची इनसाईड स्टोरी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय होण्याची शक्यता आहे. या निर्णयाचे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात दूरगामी परिणाम पडू शकतात.
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या घडामोडी घडणार आहेत. दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडण्याची शक्यता आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार आहे. ही बैठक आजच पार पडण्याची शक्यता आहे. या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात येणार आहेत.
भाजप-शिवसेनेची समन्वय समिती स्थापन होणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना आणि भाजप यांची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक होईल. या बैठकीत दोन्ही पक्षांची समन्वय समिती स्थापन करण्यात येईल. या समितीत भाजपचे 3 ते 5, शिवसेनेचे 3 ते 5 नेते असतील. ही समिती दर आठवड्याला बैठक घेईल. दोन पक्षातील समन्वयासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. जुलैमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा असणार आहे. यासाठीच या हालचाली होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी
महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कारण देशात पुढच्यावर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व विरोधी पक्ष रणनीती आखत आहे. विरोधी पक्ष भाजप विरोधात एकजुटीने सामना करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षही विरोधी पक्षाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत.
महामंडळाचं वाटप लवकरच होणार?
मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी महामंडळांचं वाटप होणार, अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. याबाबतची बातमी दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. पण याबाबत अधिकृत अशी माहिती कुणाकडूनही देण्यात आलेली नाही. दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत महत्त्वाच्या बैठका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमकं काय आधी होईल? हे आगामी काळात स्पष्ट होईल.