क्रेझ… क्रेझ… क्रेझ… महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पहिल्यांदाच अमेरिकेत दणक्यात वाढदिवस; टाईम्स स्क्वेअरमध्ये नुसता जल्लोष!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ख्याती आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचे असंख्य समर्थक आहेत. तसेच परदेशात देखील तरूणाईला त्यांच्या व्यक्तिमत्वाची भुरळ पडायला लागली आहे.
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण ठाण्यासह राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाण्यात तर एक भला मोठा केक तयार करण्यात आला आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांचा शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा प्रवास रेखाटण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांची क्रेझ फक्त ठाण्या महाराष्ट्रापुरती राहिलेली नाही. तर ही क्रेझ आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यात आला आहे. यावेळी तरुणांनी केक कापून एकच जल्लोष केला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हिडीओवरून वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ख्याती आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचे असंख्य समर्थक आहेत. तसेच परदेशात देखील तरूणाईला त्यांच्या व्यक्तिमत्वाची भुरळ पडायला लागली आहे. त्यामुळेच न्यूयॉर्क येथे कामानिमित्त असलेल्या काही तरुणांनी त्यांचा वाढदिवस टाईम्स स्क्वेअर येथे केक कापून साजरा केला.
मुख्यमंत्र्याच्या कामाची भुरळ
भारतीय वंशाच्या पण न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या काही तरूणांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस तिथे साजरा केला. ठाण्यातील युवासेनेचे कोअर कमिटी सदस्य नितीन लांडगे यांचे हे मित्र असून त्यांच्याकडूनच कायम ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल ऐकत असतात.
त्यांच्या कामाची पद्धत, संवेदनशील वृत्ती आणि कार्यतत्परता याची भुरळ पडल्यानेच यंदा या मित्रांनी मिळून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस टाईम्स स्क्वेअरमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला. अभिनव जैन, राजीव पंड्या, रूचिता जैन अशी या वाढदिवस साजरा करणाऱ्या तरूणांची नावे आहेत.
कमी वेळात धडाकेबाज निर्णय
मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अत्यंत कमी वेळात धडाकेबाज निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरात राहणाऱ्या मराठी अमराठी माणसांच्या हृदयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच त्यांचा वाढदिवस न्यूयॉर्क येथे साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
बॅनर्स झळकवले
एवढ्यावरच न थांबता, या तरूणांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॅनर्स तयार करून ते टाईम्स स्क्वेअर आणि ग्रँण्ड सेंट्रल येथे झळकवले आहेत. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आगळी वेगळी भेट देण्यासाठी त्यांचा वाढदिवस अशाप्रकारे साजरा करण्याचा निर्णय या तरूणांनी घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा डंका सातासमुद्रापार विस्तारला असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.
केक कापून शुभेच्छा
या तरुणांनी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवसाचा केक कापतानाचा व्हिडीओ तयार केला आहे. केक कापल्यानंतर मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाही हे तरुण दिसत आहेत.
केकवर राजकीय प्रवास
दरम्यान, ठाण्यातील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाची जय्यत तयारी केली आहे. या कार्यकर्त्यांनी एक विशेष केक तयार केला आहे. या केकमधून एकनाथ शिंदे यांचा शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा प्रवास साकारला आहे. संपूर्ण राजकीय प्रवास साकारलेला हा आगळावेगळा केक कुतुहुलाचा विषय ठरत आहे.