CM Uddhav Thackeray: 2017मध्ये छुपं राजकारण काय चाललंय याची माहिती नव्हती; मुख्यमंत्र्यांनी युतीची ती चर्चा फेटाळली
CM Uddhav Thackeray: आम्ही तिघं एकत्रं आलो हे लोकांना आश्चर्य वाटतं. आता आम्ही तीन विचारधारेचे लोकं चांगले काम करतं आहोत.
मुंबई: 2017मध्ये राज्यात नवं समीकरण होणार होतं. राष्ट्रवादी काँग्रेस भाजप-सेना युतीत यायला तयार होती. पण त्याला शिवसेनेने विरोध केला होता, असा दावा भाजप नेते आशिष शेलार (ashish shelar) यांनी केला होता. त्यावरून राजकीय प्रतक्रियांचं मोहोळ उठलं होतं. या चर्चांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पहिल्यांदाच उत्तर दिलं आहे. 2017मध्ये छुपं काय चाललंय हे शिवसेनेला (shivsena) माहीत नव्हतं. तीन पक्षाची युती होण्याबाबत त्यावेळेला आम्हाला सांगितलं गेलं नव्हतं. मला खोटं बोलायचं नाही. माझ्या लोकांशी बोलायचं नाही. माझी राजकीय कारकिर्द युतीत झाली. 25 वर्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच युती घट्ट झाली होती. त्यावेळी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी हा पर्याय आलाच नव्हता. 2017 रोजी नेमकं काय होतं की त्यांना युती करावीशी वाटली? त्यावेळी महापालिका निवडणुका होत्या. त्यावेळी शिवसेना भाजपची युती तुटली होती. मग तीन पक्षाच्या युतीचा प्रश्न येतो कुठे? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी हा खुलासा केला. 2017मध्ये काय झालं यावर जे सांगितलं जात आहे, त्याला दंतकथा म्हटलं तर दाखवयाचे आणि खायचे दात वेगळे होते. त्यामुळे कुठल्या दाताची कुठली कथा असंच म्हणावे लागेल. ते बोलतात. तेच त्यांचे दाखवयाचे दात असू शकतील. त्यांची दंतकथा वेगळी असू शकेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
निवडणुकीनंतरही युती कायम राहील
आम्ही तिघं एकत्रं आलो हे लोकांना आश्चर्य वाटतं. आता आम्ही तीन विचारधारेचे लोकं चांगले काम करतं आहोत. याचं आश्चर्यही लोकांना वाटतं. हे सरकार निवडणुकीत आणि निवडणुकीतनंतरही कायम राहील. जोपर्यंत एकमेकांच्या मनात पाप येत नाही, मित्र म्हणायचा आणि पाठीत वार करायचं असं होत नाही तोपर्यंत आम्ही 25 -30 वर्ष भाजप सोबत राहिलो होतो. त्यावेळीही चटके फटके खाल्ले होते, असंही त्यांनी सांगितलं.
ते हिंदुत्वाचा खेळ करत आहेत
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजप आणि मनसेवर टीका केली. आम्ही नव्या खेळाडूंकडे लक्ष देत नाही. हे खेळाडू कोणत्या मैदानात कोणते खेळ करतात आतापर्यंत लोकांनी अनुभवलं. कधी मराठी, कधी हिंदुत्वाचा खेळ… मी इतरांचा अपमान करत नाही. डोंबारी वगैरेंचा… मी असा खेळ पाहिला आहे. दोन वर्षाचा कालखंड मोठा होता. नाटक, सिनेमा बंद होते. त्यामुळे लोकांना करमणूक मिळत असेल तर का नाही पाहणार? असा टोला त्यांनी लगावला.