CM Uddhav Thackeray: आता राज्यभर करारा जवाब मिळणार, उद्धव ठाकरे घेणार विभागवार सभा; शिवसेनेची जय्यत तयारी सुरू
CM Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज बीकेसीला सभा होणार आहे. ही अतिविराट सभा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबई: आजारपणातून बरे झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) पहिल्यांदाच आज जाहीर सभा घेणार आहे. या सभेतून ते अनेकांवर तोफ डागणार आहेत. शिवसेनेवर (shivsena) झालेल्या आरोपांचा समाचार घेतानाच शिवसेनेच्या पुढील वाटचालीवरही भाष्य करणार आहेत. याच रॅलीतून उद्धव ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंगही फुंकणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभांकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. बीकेसी येथे होणाऱ्या या सभेनंतर उद्धव ठाकरे राज्यात जिल्हावार सभा घेणार आहेत. शिवसेनेत नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आणि शिवसेनेचं संघटन मजबूत करण्यासाठी या सभा घेण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनीही जिल्हा जिल्ह्यात सभा घेण्याचं या आधीच जाहीर केलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ठाकरे बंधूंच्या तोफा राज्यभर धडाडताना दिसणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज बीकेसीला सभा होणार आहे. ही अतिविराट सभा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या सभेनंतर उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. मराठवाडा आणि विदर्भावर सध्या शिवसेनेने सर्वाधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा आणि विदर्भातही मोठ्या प्रमाणावर सभा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
भाजपने नवा धंदा सुरू केलाय
दरम्यान, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आजच्या सभेची माहिती दिली. दोन वर्षांपासून उद्धव ठाकरे यांची सभा झाली नव्हती. उद्धवजींचे भाषण ऐकायला राज्यातील जनतेसोबत देशातील जनता आसूसलेली आहे. भाजपने सर्वकाही करून पाहिले म्हणून मनसे, राणा दाम्पत्य यांच्या माध्यमातून टीका केली जात आहे. भाजपने हा धंदा सुरू केलाय. जे बोंबलतात त्यांच्या तोंडात सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे बोळा कोंबतील, असं विनायक राऊत म्हणाले.
राणा दाम्पत्यांची औकात काय?
शिवसेनेचे हिंदुत्व प्रखर आहे ते सभेतून सांगितले जाईल. तसेच 3 वर्षात सरकारने काय केले तेही सभेतून सांगितले जाईल. विरोधक किती कोकटले तरी आम्हाला फरक पडणार नाही. त्यांचा जळफळाट होतोय. हे सर्व कौरव आहेत, शिवसेनेचा महामेरू कोणी रोखू शकणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोण राणा दाम्पत्य? काय त्यांची औकात? हनुमान चालिसाचा अवमान त्यांनी केला. शिवसेना त्यांना महत्व देत नाही, अशी टीका त्यांनी राणा दाम्पत्यांवर केली.