काँग्रेसला वगळून आघाडीचा प्रयत्न भाजपालाच मदत करणारा : नाना पटोले
काँग्रेसला वगळून अनेक आघाड्या करण्याचे प्रयत्न केले गेले त्याचा फायदा कोणाला होतो हेही कळले असून सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष यापुढेही भाजपाला तोंड देण्यास समर्थ आहे असेही पटोले म्हणाले.
मुंबई : काँग्रेस पक्ष व राहुलजी गांधी हेच गेल्या 7 वर्षापासून केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात रान पेटवून सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहेत. भाजपासारख्या विभाजनवादी शक्तीविरोधीत एकत्रित लढा देणे ही काळाची गरज असताना काही लोक भाजपाला मदत होईल अशी भूमिका घेत आहेत. 2019 च्या निवडणुकीतही असाच प्रयत्न केला गेला ज्याचा फायदा भारतीय जनता पक्षालाच झाला होता अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
काँग्रेस दडपशाहीला भीक घालत नाही
भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळात देश, लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे. सीबीआय, ईडी, आयकर सारख्या सर्व सरकारी यंत्रणांची भीती विरोधीपक्षांना दाखवली जात आहे परंतु काँग्रेस अशा कोणत्याच दडपशाहीला भीक घालत नाही. राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी या सातत्याने केंद्र सरकारच्या अत्याचाराविरोधात आक्रमपणे लढा देत आहेत. शेतकरी, कामगार, दलित, पीडित समाजाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.
काही राजकीय पक्ष ईडी, सीबीआयच्या कारवाईच्या भितीने भाजपाविरोधात बोटचेपी भूमिका घेत आहेत. काँग्रेस पक्ष मात्र रस्त्यावर उतरुन केंद्र सरकार विरोधात लढत आहे. अहंकारी सत्तेलाही सामान्य जनतेच्या शक्तीसमोर हार मानावी लागते हे शेतकरी आंदोलनाने दाखवून दिले आहे. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे तीन काळे कृषी कायदे 12 मिनिटात रद्द करावे लागले.
काँग्रेस पक्ष भाजपला तोंड देण्यास समर्थ
महागाई, शेतकरी, कामगारांचे व जनतेच्या प्रश्नावर काँग्रेसचा संघर्ष सुरु आहे व यापुढेही तो सुरुच राहिल. जनतेचा काँग्रेस पक्षावर विश्वास आहे व हा विश्वास दिवसेंदिवस आणखी वाढत आहे. काँग्रेस पक्षाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. काँग्रेस पक्ष भाजपाच्या विरोधात ठाम उभा तसेच इतर पक्षही कोणाबरोबर आहेत हे देशातील जनतेला माहिती झाले पाहिजे. काँग्रेसला वगळून अनेक आघाड्या करण्याचे प्रयत्न केले गेले त्याचा फायदा कोणाला होतो हेही कळले असून सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष यापुढेही भाजपाला तोंड देण्यास समर्थ आहे असेही पटोले म्हणाले. (Congress leader Nana Patole’s reaction on the third front)
इतर बातम्या
VIDEO: यूपीए कुठे अस्तित्वात आहे?; आता राऊत म्हणतात, एनडीए तरी कुठं अस्तित्वात आहे?