गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात मुंबईतही राडा, स्टेजखालीच एकाला चोपचोप चोपले; दहीहंडी उत्सवात नेमकं काय घडलं?
गौतमी काल खास मराठमोळ्या वेषात आली होती. तिने नाकात नथ घातली होती. त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता. गौतमी मनापासून हसली त्यानंतर तिने त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. माझी मैत्रीण नथ बनवते. त्यामुळे तिने बनवलेली मी नथ घातली आहे, असं ती म्हणाली.
मुंबई | 8 सप्टेंबर 2023 : नृत्यांगना गौतमी पाटील हिने पुन्हा एकदा आपणच सबसे कातील गौतमी पाटील असल्याचं सिद्ध केलं आहे. काल मुंबईसह राज्यात दहीहंडीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाला मोठमोठे सेलिब्रिटी आले होते. या सेलिब्रिटींनी दहीहंडी उत्सवात नृत्यही केलं. फिल्मी डॉयलॉगही म्हटले. पण क्रेझ पाहायला मिळाली ती गौतमी पाटील हिचीच. गौतमी आली, तिनं पाहिलं आणि तिनं जिंकून घेतलं, असाच कालचा माहौल होता. गौतमी पहिल्यांदाच मुंबईत आली. मुंबईकरांनीही तिचं भरभरून स्वागत केलं. गौतमी येताच एकच कल्ला झाला. त्यावरून गावखेड्यातच नव्हे तर मुंबईसारख्या झगमगाटी दुनियेच्या शहरातही गौतमीची क्रेझ कायम असल्याचं दिसून आलं.
गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा हे समीकरण ठरलेलंच आहे. त्याला मुंबईतरी कशी अपवाद राहील. गौतमीने काल मुंबई-ठाण्यातील अनेक दहीहंडी उत्सवांना हजेरी लावली. यावेळी गौतमीने डान्स करत आपल्या चाहत्यांना घायाळ केले. मुलुंडमध्ये मात्र तिच्या कार्यक्रमात राडा झालेला पाहायला मिळाला. गौतमीच्या डान्सदरम्यान एका तरुणाला चांगलाच चोप देण्यात आला. गौतमीचा डान्स ऐन भरात आलेला असताना हा तरुण स्टेजवर चढण्याचा प्रयत्न करत होता.
त्यामुळे पब्लिकनेच त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण तो ऐकेना. स्टेजवर जाण्याचा त्याचा प्रयत्न सुरूच होता. त्यामुळे संतप्त झालेल्या पब्लिकने त्याला येथेच्छ चोप देत त्याची धुलाई केली. त्यामुळे कार्यक्रमस्थळाचं वातावरण तंग झालं होतं. एवढ्यात पोलिसांनी हस्तक्षेप करत या तरुणाला कार्यक्रम स्थळाहून बाहेर काढून घरी पाठवलं. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. त्यानंतर गौतमी पाटील हिचा डान्स पुन्हा दणक्यात सुरू झाला.
ठाण्यात गौतमीच्या लटके झटके अदा
ठाण्यातील मागाठाणे येथे तारामती चॅरिटेबल फाउंडेशन आणि आमदार प्रकाश सुर्वे यांनी भव्य दहीकाला महोत्सव आयोजित केला होता. यावेळी विविध कलाकारांनी हजेरी लावली. गौतमी पाटील हिनेही या दहीहंडी उत्सवाला सर्वात आधी हजेरी लावली. यावेळी गौतमी पाटील यांनी तीन चार गाण्यावर डान्स करत सर्वांचं मन जिंकून घेतलं. गौतमीचा डान्स सुरू होताच एकच कल्ला सुरू झाला. डान्स आणि शिट्ट्यांची पाऊस सुरू होता. दुसरीकडे गौतमीचा डान्स सुरू असताना वरूण राजानेही हजेरी लावली. त्यामुळे गोविंदांचा उत्साह अधिकच वाढला होता.
नाकात नथ आणि…
मागाठाणेतील कार्यक्रमानंतर गौतमीने प्रतिक्रिया व्यक्त केली. माझे अधिक कार्यक्रम पुण्यात होत असतात. मुंबईत फार कार्यक्रम झाले नाही. इथे खूप छान वाटले. बऱ्याच ठिकाणी जाते. पण इथे आल्याने छान वाटलं. मला मुंबईकरांचेही प्रेम लाभले. मुंबई सुरक्षित आहे. सर्वच ठिकाणी मुंबई सुरक्षित आहे, असं गौतमी म्हणाली.