सरकारकडून दाऊद संबंधित लोकांना वाचवण्याचा प्रयत्न, दरेकरांचा आरोप; भाजपचे मलिक हटाव, देश बचाव अभियान सुरू
भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, एका बाजूला साधूंसंताचा महाराष्ट्र सांगायचे आणि दुसरीकडे दहशतवाद्यांना फडिंग करणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा. आता तर गुन्हेगारांची जमीन खरेदी केली म्हणून नवाब मलिक आरोपी नव्हेत, असा जावई शोध महाविकास आघाडी करतेय. या घटनेला मुस्लीम रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.
सोलापूरः महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) प्रकरणात अतिरेक्यांना पैसे पुरवण्याचे काम कोणी केले हे समोर आले आहे. हे टेरर फंडिंग कनेक्शन आहे. मलिकांना भाजपने नव्हे, तर न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. त्यामुळे भाजपने नवाब मलिक हटाव, देश बचाव अभियान सुरू केले आहे. एकीकडे डॉक्टर आंदोलन करतायत. एसटी आंदोलन सुरूय. त्यांच्याकडे लक्ष द्यायला राज्य सरकारला वेळ नाही. मात्र, दाऊदशी संबंधित लोकांना वाचवण्यासाठी वेळ आहे, असा घणाघाती आरोप मंगळवारी भाजप नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी केला. ते सोलापूरमध्ये बोलत होते. आमच्यावर सुडाने कारवाई केल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकार करते आहे. मात्र, या अभियानातून त्यांचे आरोप आम्ही खोडून काढू, असा दावाही त्यांनी केला.
काय म्हणाले दरेकर?
प्रवीण दरेकर म्हणाले की, अनिल देशमुखांवर आरोप झाले. तेव्हाही भाजपचा संबंध जोडला. मात्र, यात भाजपचा कोणताही संबंध नाही. ठाण्याचे आमदार सरनाईक यांनी परदेशात व्यवहार केला त्यामुळे ईडीने कारवाई केली. वनमंत्री संजय राठोड यांनी मुलीला आत्महत्या करायला भाग पाडले. हसन मुश्रीफ यांच्या जावयाने टेंडर घेतल्यामुळे त्यांच्यावर आरोप झाले, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
मलिकांवर कारवाई कशी झाली?
प्रवीण दरेकर म्हणाले की, नारायण राणेंवरही कारवाई झाली. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी करमुसे यांना मारहाण केली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली. यात भाजपने कोठेही तक्रार केलेली नाही. उलट नवाब मलिकांना देशभक्त दाखवण्याचा प्रयत्न होतोय. मात्र,सलिम पटेल आणि शाहवली खान यांच्यामार्फत जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार झाली. मुनिरा पटेल यांना पैसे न देता मुनीर पटेल आणि शाहवली खान यांना कुलमुख्त्यार केले. यात नवाब मलिक यांचा संबंध उघड झाला. त्यामुळे ही कारवाई झाली, असा दावाही त्यांनी केला.
मुस्लीम रंग देण्याचा प्रयत्न
प्रवीण दरेकर म्हणाले की, मलिकांना विनासमन्स अटक करता येत नसल्याचा युक्तिवाद केला गेला. मात्र, त्यावर कोर्टाने स्पष्टपणे सांगितले की, ही PMLA (19) ॲक्टनुसार कारवाई केली आहे. ते मनी लॉड्रिंग प्रकरणात अडकले आहेत. त्यांना भाजपने नव्हे, तर न्यायालयाने कस्टडी दिलीय. अतिरेक्यांना पैसे पुरवण्याचे काम कोणी केले हे समोर आले. हे टेरर फंडिंग आहे. एका बाजूला साधूंसंताचा महाराष्ट्र सांगायचे आणि दुसरीकडे दहशतवाद्यांना फडिंग करणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा. आता तर गुन्हेगारांची जमीन खरेदी केली म्हणून नवाब मलिक आरोपी नव्हेत, असा जावई शोध महाविकास आघाडी करतेय. या घटनेला मुस्लीम रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.
इतर बातम्याः
चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!
कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग