‘तुमचे चिरंजीव बिहारमध्ये जाऊन लोटांगण घालतात, तेव्हा महाराष्ट्र दुर्बल दिसत नाही का?’
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील तिखट शब्दांमध्ये उत्तर दिलंय
कोल्हापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील तिखट शब्दांमध्ये उत्तर दिलंय. “उद्धव ठाकरे यांची पोटदुखी वेगळी आहे. सत्ता गेल्याचं त्यांना दुःखं आहे”, असा घणाघात त्यांनी केला. “तुमचे चिरंजीव बिहारमध्ये जाऊन लोटांगण घालत आहेत. त्यावेळी महाराष्ट्र दुर्बल झाला हे दिसले नाही का?”, असा प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारलाय.
“शिंदे सरकारने महाराष्ट्राची जनता ठरवेल की ताकद कमी केली की वाढवली? गेल्या सरकारपेक्षा आम्ही राज्याची ताकद वाढवली आहे. एका क्लिकवर आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले”, असं दीपक केसरकर म्हणाले.
“तुमची सत्ता असताना विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबतचा प्रस्ताव दिला नाही. इतके तुम्ही लाचार झाला होता, तुम्ही दुर्मिळ झाला होता”, असा घणाघात त्यांनी केला.
“आमचे सरकार येऊन चार महिने झाले नाही तोवर टीका करायची. हे तुमचे उद्योग जनतेला माहीत आहे. बोलण्यासाठी कुणी नाही म्हणून माणसं आयात करावी लागतात. आपण कमजोर झालो म्हणून दुसऱ्याला कमजोर म्हणता, अनेक पक्षांचे आधार घेता”, असा टोला त्यांनी लगावला.
“छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान कधीही महाराष्ट्र सहन करणार नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या बद्दलची भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केंद्राला कळवली आहे”, असं केसरकर म्हणाले.
“शिवसेना खासदार संजय राऊत यांची सुरक्षा काढून घेणं हा निर्णय सरकार घेत नाही. ज्यांच्यापासून त्यांना धोका होता ते आता सगळे त्यांच्याबरोबरच आहेत”, असा दावा त्यांनी केला.
“शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांना तलवार पेलणार नाही असं म्हणणाऱ्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल काय बोलायचे? उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे वागावे इतकीच अपेक्षा”, असा टोला त्यांनी लगावला.
“भाजप बद्दल जर इतकी पोटदुखी असेल तर मुंबई पालिकेत पाठींबा का घेतला?”, असाही सवाल त्यांनी यावेळी केला.