मनसेला सोबत घेणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, मिले सूर मेरा…
"आमचे संबंध मनसे अध्यक्ष राज ठाकरेंशी आहेतच. राज ठाकरेंची हिंदुत्वाची भूमिका मान्य. त्यांची भूमिका व्यापक नव्हती, क्षेत्रीय अस्मिता अडचणीची नाही. क्षेत्रीय अस्मिता असली पाहिजे. पण प्रांतवाद म्हणजे राष्ट्रवादाला विरोध असं नाही. राज ठाकरे यांनी राष्ट्रीय अस्मिता स्वीकारली आहे. त्यामुळे त्यांचा विरोध राहिला नाही", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई | 1 मार्च 2024 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘लोकसभेचा महासंग्राम‘ कार्यक्रमात विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आणि देशातील सध्याच्या विविध घडामोडींबाबत विचारलेल्या प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणीस यांना यावेळी मनसे पक्षासोबत युती करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीस यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. “आमचे संबंध मनसे अध्यक्ष राज ठाकरेंशी आहेतच. राज ठाकरेंची हिंदुत्वाची भूमिका मान्य. त्यांची भूमिका व्यापक नव्हती, क्षेत्रीय अस्मिता अडचणीची नाही. क्षेत्रीय अस्मिता असली पाहिजे. पण प्रांतवाद म्हणजे राष्ट्रवादाला विरोध असं नाही. राज ठाकरे यांनी राष्ट्रीय अस्मिता स्वीकारली आहे. त्यामुळे त्यांचा विरोध राहिला नाही. त्यांचे आमचे विचार जुळत आहेत. पण याचा अर्थ असा नाही की आमची युती होणार आहे. मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा अशी स्थिती यायची आहे”, असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
“भाजप फोडाफोडीच्या चर्चांकडे तुम्ही वेगळ्या पद्धतीने का नाही पाहत? आम्ही पक्ष फोडले म्हणण्यापेक्षा त्यांना पक्ष वाचवता आले नाही. काही कमतरता राहिली असेल ना त्यांच्याकडे? त्यांचे लोकं त्यांच्यासोबत राहत नाही. विरोधक नेतृत्वहीन आहे. नेता नाही, नीती नाही, नियत नाही अशी त्यांची अवस्था आहे. अशा परिस्थितीत जमिनीशी जोडलेल्यांची घुसमट होते. नेतृत्वाचा अंधार असेल तर त्यांना काम करावं वाटत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकासाचा अजेंडा राबवला आहे. 25 कोटी लोकं गरिबीच्यावर येणं हा चमत्कार आहे. आमच्याकडे कुणी येत असेल तर स्वागतच करू”, असं देवेंद्र फडणीस म्हणाले.
अशोक चव्हाण यांना का घेतलं?
“अशोक चव्हाणांवर आरोप झाले ते आमच्या काळात झाले नाही. त्यांच्याच काळात झाले. त्यांच्याच पक्षाने सीबीआय चौकशी केली. चार्जशीट त्यांच्याच सरकारमध्ये झाले. ते हायकोर्टात जिंकले. आता सुप्रीम कोर्टात गेले. त्यांच्या सारखा मजबूत नेता आमच्यासोबत येत असेल तर मराठवाड्यात ताकद वाढेल. का घेऊ नये?”, असा प्रतिप्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“पहिली गोष्ट तर जे आमच्यासोबत येतात त्यांना घेतो. इतरांचा पास्ट असेल तर ते उतरवण्याची जबाबदारी आमची नाही. ते त्यांनाच न्यायचं आहे. त्यांनाच केस फेस करायचं आहे. आमचा प्रश्न एवढाच आहे, लोक आपली शक्ती संघटित करायला तयार असतील तर आम्ही सोबत घेतो. मोदींच्या नेतृत्वात जमिनीशी जोडलेले नेते येत असतील तर घेत असतो”, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.
आणखी कोणाला फोडणार?
“दुसरा राऊंड नाही. अनेक लोक आमच्या संपर्कात येतात. सोबत यायला तयार असता. एवढा मोठा माणूस येत असेल तर कसं घेणार नाही. त्यामुळे घेतो. पण माझं एकच उत्तर असतं आगे आगे देखो होता है क्या”, असं सूचक वक्तव्य फडणवीसांनी केलं.