कारवाई टाळण्यासाठी भूमाफियाचा प्रताप, ५ तास रस्ता ठेवला रोखून
dombivli : अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे भूमाफिया वरचढ ठरु लागले आहे. आता तर कारवाईसाठी आलेल्या अधिकाऱ्यांचा रस्ता बंद करण्याचा प्रताप डोंबविलीत भूमाफियांनी केला. तब्बल पाच तास हा खेळ सुरु होता.
सुनील जाधव, डोंबिवली : कल्याण डोंबिवली शहरात अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट झाला आहे. भूमाफिया अधिकारी, लोकप्रतिनिधीना न घाबरता इमारती उभ्या करत आहेत. विशेष म्हणजे तक्रारीनंतर कारवाई होऊ नये, यासाठीही भूमाफियांनी अनोखी शक्कल लढवत असल्याचे डोंबिवलीत दिसू आले आहे. अनधिकृत इमारतीवर कारवाईसाठी आलेल्या पथकाच्या रस्त्यावर चारचाकी गाड्या लावल्या आणि रस्ता बंद करून ठेवला. तब्बल ५ तास रस्ता बंद होता. यावेळी भूमाफिया आणि अधिकारी यांचा डोंबिवलीमध्ये हा खेळ सुरु होता.
काय आहे नेमका प्रकार
डोंबिवलीच्या कुंभारखान पाडा परिसरात आरक्षित भूखंडावर ७ मजली इमारतीचे काम सुरु होते. याबाबत स्थानिक नगरसेवक विकास म्हात्रे यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. वर्षभरापूर्वीपासून करण्यात आलेल्या या तक्रारीची दखल घेत तत्कालीन प्रभाग क्षेत्र अधिकारी अक्षय गुडधे आणि सुहास गुप्ते यांनी या इमारतीवर दोन वेळा तोडकी कारवाई केली. मात्र तरीही अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून ही इमारत पुन्हा उभी केली होती. यामुळे पुन्हा या इमारतीवर कारवाई करण्याचा कार्यक्रम प्रशासनाकडून आखण्यात आला होता.
भूमाफियांची अशी शक्कल
सकाळीच पोलीस बंदोबस्तात जेसीबी, ब्रेकरच्या लवाजम्यासह पालिकेचे पथक कारवाईसाठी दाखल झाले. यावेळी इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यात मधोमध दोन चार चाकी गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. या गाडीच्या मागच्या बाजूस गाडी बंद पडली आहे. दुपारपर्यत काढण्यात येईल. सोसायटीच्या रहिवाशांना त्रास दिल्याबद्दल क्षमा असावी कृपया सहकार्य करावे असा स्टीकर चिकटवण्यात आला होता. मात्र एकाच ठिकाणी दोन गाड्या एकाच वेळी कशा बंद पडू शकतात असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
वाहने पोहचू शकत नव्हती
या गाड्यामुळे मोठी वाहने इमारतीपर्यंत पोचण्याचा मार्ग बंद झाला. दुपारी ३ वाजेपर्यत अधिकारी या गाड्या काढण्याची प्रतीक्षा करत होते. अखेर टोईग व्हॅनच्या मदतीने गाड्या बाजूला करत मशिनरी जागेवर नेत कारवाई सुरु करण्यात आली. याप्रकरणी प्रभाग क्षेत्र अधिकारी गुप्ते यांनी संबधित इमारत मालकाविरोधात विष्णूनगर पोलीसा ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याॉबद्दल तसेच अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी गुन्हा केला.
अखेर इमारत तोडली
गुरुवारी दुपारनंतर चार ब्रेकरच्या मदतीने इमारतीचे स्लॅब तोडण्याचे काम सुरु करण्यात आले. मात्र प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्यानेच अधिकाऱ्यांची पाठ फिरताच पुन्हा भूमाफिया नव्या जोमाने तोडलेल्या इमारतींची डागडुजी करतात आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ करतात. या इमारती पूर्णपणे जमीनदोस्त करत त्याठिकाणी नव्याने इमारती उभ्या राहू नये, यासाठी ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे.
हे ही वाचा
पुणे, मुंबईतील विकासकांना महारेराचा मोठा दणका, कशासाठी ठोठावला दंड?
पोलिसांचा मनस्ताप वाढला, वाहतूक पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी वाहन चालकाची नवी युक्ती