प्रेमाच्या आड येणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा, हत्या करुन…
Crime News | गेल्या चार महिन्यांपासून हे दोघे त्याच्या हत्येचा कट रचत होते. 20 जानेवारी रोजी त्यांनी संधी साधली. सुमित विश्वकर्मा व त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांनी एका इको कारमध्ये चंद्रप्रकाश याला एका निर्जन स्थळी नेले.
सुनिल जाधव, डोंबिवली, धाराशिव, दि.30 जानेवारी 2024 | डोंबिवलीत प्रेमसंबंधांतून एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने कट रचत आपल्या पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर उघड झाली आहे. धक्कादायक म्हणजे पतीच्या हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह एका मोठ्या दगडाला बांधून विहिरीत पत्नीने फेकला. त्यानंतर आपल्यावर संशय येऊ नये म्हणून मिसिंग तक्रार देखील पोलिसांत दाखल केली. मात्र चार दिवसाने मृतदेह विहिरीवरती तरंगत असलेला दिसला. त्यानंतर पोलिसांनी तपास करत पत्नी व तिच्या बॉयफ्रेंडला खाकी दाखवत विचारपूस सुरू केले. त्यांनी हत्येची कबुली दिली. रिता चंद्रप्रकाश लोवंशी व तिचा प्रियकर सुमित राजेश विश्वकर्मा असे आरोपींची नावे आहेत.
असा केला खून
रिता हिने त्यांनी दोन अल्पवयीन मित्राच्या मदतीने वीस तारखेला पती चंद्रप्रकाश लोवंशी कामावरून परतत असताना त्याचे अपहरण केले. त्याला जंगलात नेत त्याच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर नायलॉनच्या दोरीने गळा दाबून त्याची हत्या केली. पुरावे नष्ट करण्यासाठी रात्री दीडच्या सुमारास त्याचा मृतदेह डोंबिवली आडीवली गावात एका विहिरीजवळ नेला. त्यानंतर मृतदेह दगडांनी बांधून विहिरीत फेकून दिला. त्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात जात मिसिंग तक्रार दाखल दिली.
पोलिसांना मृतदेह सापडला अन् तपास
२५ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कल्याण ग्रामीण परिसरातील अडीवली गावातील विहिरीत एका इसमाचा मृतदेह सापडला. मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना या मृतदेहास दगडाला बांधून विहिरीत ढकलला असल्याचे निदर्शनास आले. या मृतदेहावर गळ्यावर वार देखील करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे मानपाडा पोलिसांना या व्यक्तीचे हत्या करून त्याला विहिरीत टाकून दिल्याचा संशय आला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू केले. डीसीपी सचिन गुंजाळ एसीपी सुनील कुराडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी राम चोपडे, दत्तात्रय गुंड ,निशा चव्हाण, संपत फडोळ, प्रशांत आंधळे यांच्या पथकाने तपास सुरु केला. अवघ्या काही तासात मृतदेहाची ओळख पटली. चंद्रप्रकाश लोवंशी यांच्या असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांकडून पत्नीची चौकशी
पोलिसांनी चंद्रप्रकाश लोवंशी यांची पत्नी रिता हिची चौकशी सुरू केली. तिने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांना तीच्यावर संशय आला. पोलीस खाक्या दाखवतच तिने तिचा प्रियकर सुमित विश्वकर्माचे नाव सांगितले. पोलिसांनी तात्काळ सुमित विश्वकर्माला ताब्यात घेतले. या दोघांकडून माहिती घेतली असता पोलीस त्यांना देखील धक्का बसला. सुमित विश्वकर्मा व रीताचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. चंद्रप्रकाश हा या प्रेमसंबंधाला अडचण ठरत होता. त्यामुळे या दोघांनी त्याला संपवण्याचा निर्णय घेतला.
चार महिन्यांपासून हत्येचा प्रयत्न
गेल्या चार महिन्यांपासून हे दोघे त्याच्या हत्येचा कट रचत होते. 20 जानेवारी रोजी त्यांनी संधी साधली. सुमित विश्वकर्मा व त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांनी एका इको कारमध्ये चंद्रप्रकाश याला एका निर्जन स्थळी नेले. त्या ठिकाणी चंद्रप्रकाशचा गळा चिरून पाठीवर गुडघ्यावर वार करून क्रूरपणे हत्या केली. कुणाला संशय येऊ नये म्हणून त्याचा मृतदेह अडवली परिसरातील एका विहिरीत दगड बांधून फेकून दिला. याच दरम्यान रिता लोवंशी हिने पती चंद्रप्रकाश हा बेपत्ता असल्याचे तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात नोंदवली होती. पोलिसांनी या हत्याकांडाचा अवघ्या 24 तासात पोलखोल करत सुमित विश्वकर्मावर रीता लोवंशी या दोघांनाही अटक केली.