Lalit Patil Case | कहाणीमध्ये ट्विस्ट, ललित पाटील याच्या वकिलाचा अजबच दावा
ड्रग्ज माफीया ललित पाटील याला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आलंय. या प्रकरणात आता अनेक मोठी नावं समोर येण्याची शक्यता आहे. असं असताना आता ललित पाटील याच्या वकिलाने वेगळाच दावा केलाय.
गिरीश गायकवाड, Tv9 मराठी, मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : मुंबई पोलिसांनी 300 कोटींच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणातील फरार आरोपी ललित पाटील याच्या अखेर मुसक्या आवळल्या आहेत. ललित पाटील गेल्या 15 दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता. पण अखेर बंगळुरुतून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ललित पाटील याला अटक करण्यात आल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर निशाणा साधत आहेत. ललित पाटील याने स्वत: याबाबत धक्कादायक दावा केलाय. मी पळून गेलो नव्हतो तर मला पळवलं गेलं होतं. मला पळवण्यात कुणाकुणाचा हात आहे हे सगळं बाहेर काढणार, असं ललित पाटील म्हणाला आहे. त्यानंतर आता ललित पाटील याचे वकील राहुल कांबळे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिलीय.
“मी ललित पाटील यांचा वकील आहे. ललित पाटील यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. ललित पाटील यांना बरंच काही कोर्टाला सांगायचं आहे. कोर्टाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. त्यामुळे मी उद्याच जाऊन त्यांना पोलीस स्टेशनमध्ये भेटणार आहे. त्या ठिकाणी त्यांचा जबाब मी नोंदवून घेणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत”, असं वकील राहुल कांबळे म्हणाले.
‘माझ्या आशिलला विनाकारण फसवण्यात आलंय’
“केवळ संशयाच्या आधारावर त्यांना त्या ठिकाणी पोलिसांनी अटक केलीय, असं प्रथमदर्शनी आम्हाला तरी वाटतं. त्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही आमची तयारी करत आहोत. माझ्या आशिलला विनाकारण यामध्ये फसवण्यात आलेलं आहे, असं तरी प्रथम दर्शनी वाटतंय. कारण त्या ठिकाणी पोलिसांनी कॉल डेटा रेकॉर्ड काढले होते. त्यानुसार त्यांनी त्याला चेन्नईहून अटक केलेली आहे. त्याचा कुठलाही दोष नव्हता. अर्धा किलोमीटरचं त्याचं लोकेशन दाखवत होतं. या ठिकाणी गुन्हा घडला होता”, असा दावा ललितच्या वकिलांनी केलाय.
“गुन्हा घडला तेव्हा तो तिथे आसपास होता. त्यामुळे ही कारवाई पोलिसांनी केलेली आहे. ही कारवाई योग्य नाही, असं आमचं म्हणणं आहे. हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यामुळे यामध्ये घाई करता कामा नये आणि योग्य तो तपास व्हायला हवा अशी आमची न्यायालयाकडे मागणी आहे”, अशी प्रतिक्रिया ललितच्या वकिलांनी दिलीय.