ईडी प्रचंड अॅक्शन मोडवर, मुंबईत धाडसत्र, मग जबाब नोंदवले, आता आर्थिक गुन्हे शाखेला पुरावे दिले
कथित कोव्हिड घोटाळा प्रकरणी ईडी प्रचंड अॅक्शन मोडवर आली आहे. संबंधित प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून सुद्धा तपास सुरु आहे. या दरम्यान आता ईडीकडून आर्थिक गुन्हे शाखेला महत्त्वाचे पुरावे देण्यात आले आहेत.
मुंबई | 24 जुलै 2023 : कथित कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोरोना काळात मुंबई महापालिकेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता. कोव्हिड सेंटरमध्ये आरोग्य उपकरणांच्या किंमती कित्येक पटीने जास्त दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली. ईडीने अनेक ठिकाणी धाडी टाकत अनेकांचे जबाब नोंदवले. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडूनही याप्रकरणाचा तपास केला जातोय. याच प्रकरणी आता ईडीने आर्थिक गुन्हे शाखेला आपल्या तपासाचा तपशील आणि पुरावा दिल्याची माहिती मिळत आहे.
ईडीने आर्थिक गुन्हे शाखेला कथित कोविड घोटाळ्यातले पुरावे दिले आहेत. ईडीने हार्ड डिस्कच्या माध्यमातून पोलिसांनी माहिती दिलीय. ईडीच्या तपासात समोर आलेल्या बाबी आता मुंबई पोलीस तपासणार आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना उद्यादेखील चौकशीसाठी बोलावलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
ईडीने नेमके कोणते पुरावे आर्थिक गुन्हे शाखेला दिले?
ईडीने आर्थिक गुन्हे शाखेला कोव्हिड घोटाळ्यातील काही महत्वाच्या बाबी दिल्या आहेत. कोव्हिड सेंटर घोटाळा प्रकरणातील महत्वाचे पुरावे ईडीने मुंबई पोलिसांना दिले आहेत. ही माहिती हार्ड डिस्कच्या माध्यमातून देण्यात आलीय. मुंबई पोलिसांनी या माहितीच्या आधारेच आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना चौकशीसाठी बोलावले होते. विशेष म्हणजे सुरज चव्हाण यांना उद्याही आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. ईडीच्या तपासात समोर आलेल्या बाबी मुंबई पोलीस अभ्यासणार आहे.
SIT कडून 3500 कोटींच्या व्यवहारांची चौकशी
कॅगच्या अहवालानंतर मुंबई महापालिकेतील विविध व्यवहारांची चौकशी मुंबई पोलिसांच्या बनवलेल्या SIT कडून केली जातेय. SIT कडून कथित रस्ते घोटाळ्याशिवाय इतर विभागाची चौकशी सुरू आहे. कॅगच्या अहवालानुसार कोव्हिड काळातील व्यवहारांची चौकशी पोलीस करणार नाहीत. आर्थिक गुन्हे शाखेने यासंदर्भात तीन प्राथमिक चौकशा सुरू केल्या आहेत. जवळपास 3500 कोटींच्या व्यवहारांची चौकशी SIT कडून केली जात आहे. आतापर्यंत SIT कडून 25 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
संजय राऊत यांच्या निकटवर्तींना अटक
दरम्यान, ईडीने कथित कोव्हिड घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना चार दिवसांपूर्वी अटक केली आहे. कोरोना काळात सुजित पाटकर हे लाईफलाईन रुग्णालयचे प्रमुख होते. ईडीने त्यांना अटक करण्याआधी त्यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. त्यानंतर त्यांना चार दिवसांपूर्वी रात्री उशिरा अटक करण्यात आली.