ठाकरे गटाला मोठा धक्का, रवींद्र वायकर यांच्याविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
ईडीने मुंबईसह दिल्ली आणि राजस्थानमध्ये मोठी कारवाई केली आहे. मुंबईत ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याच्या घरावर छापेमाीर करण्यात आली आहे. तर राजस्थानमध्ये अधिकाऱ्यांच्या घरी धाडी टाकण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय जल जीवन मिशनमधील घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आलीय.
मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : ईडीने पुन्हा एकदा जोरदार कारवायांना सुरुवात केली आहे. मुंबईपासून दिल्ली आणि राजस्थानात ईडीने छापेमारी सुरू केली आहे. मुंबईत तर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसणारी बातमी आहे. उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीरपणे हॉटेल बनवल्याच्या आरोपाप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणअयात आला आहे. तर राजस्थानातील जयपूरमध्ये जल जीवन मिशन घोटाळ्याप्रकरणी ईडीने डझनभर ठिकाणी छापेमारी केली आहे. दिल्ली सरकारमधील मंत्री राजकुमार आनंद यांच्या घरीही ईडीने रात्रभर छापेमारी केली आहे. गेल्या 4 तासात ईडीने अनेक ठिकाणी छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबईत ईडीच्या कारवाईने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणीत वाढ करणारी बातमी आहे. ईडीने रवींद्र वायकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वायकर यांच्यावर बेकायदेशीरपणे हॉटेल बांधल्याचा आरोप आहे. जोगेश्वरी येथे पंचतारांकित हॉटेल बनवण्यासाठी वायकर यांनी पालिकेचा भूखंड हडप केल्याचा आरोप असून हा 500 कोटींचा कथित घोटाळा असल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणी वायकर यांना ईडीकडून चौकशीला बोलावलं जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
पत्नीवरही गुन्हा दाखल
ईडीने या पंचतारांकित हॉटेलशी संबंधित कागदपत्रे मागवली आहे. ईडीच्या इकनॉमिक ऑफेन्स विंगने या पूर्वी वायकर यांची चौकशी केली होती. आता ईडीने वायकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने वायकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
वरून आदेश आहे…
दिल्लीतही ईडीने मोठी कारवाई केली आहे. केजरीवाल सरकारमधील मंत्री राजकुमार आनंद यांच्या घरी ईडीने छापेमारी केली होती. त्यांच्या घरी ईडीने 23 तास छापेमारी केली. ईडीचे अधिकारी गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता राजकुमार यांच्या घरी पोहोचले. रात्रभर तपासणी केल्यानंतर पहाटे 4.30 वाजता ईडीचे अधिकारी माघारी फिरले. आम्हाला त्रास देण्यासाठी ईडीचे अधिकारी आले होते. त्यांना या छापेमारीत काहीच सापडलेलं नाही. वरून आदेश आहे. त्यामुळे आम्ही थांबलोय. पुढचा आदेश येताच निघून जाऊ, असं हे अधिकारी म्हणत होते, असा दावा मंत्र्याने केला आहे.
आपला संपवायचंय
या देशात सत्य बोलणं, दलित समाजाला राजकारणाच्या मुख्यप्रवाहात आणणं, विकासासाठी झटणं गुन्हा ठरत आहे. ईडी जे कस्टमचं प्रकरण सांगत आहे ते 20 वर्ष जुनं आहे. त्याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येऊन गेला आहे. या लोकांना आम आदमी पार्टीला संपवायचं आहे. म्हणूनच आम्हाला त्रास दिला जात आहे, असं राजकुमार यांनी स्पष्ट केलं.
अधिकारी, कंत्राटदार हादरले
देशातील सर्वात मोठी पेयजल योजना असलेल्या जल जीवन मिशनमध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणी ईडीने कारवाई सुरू केली आहे. राजस्थानात आज ईडीच्या टीमने पुन्हा एकदा दोन डझन ठिकाणी छापेमारी केली. आज सकाळीच पीएचईडीचे एसीएस सुबोध अग्रवाल सहीत अनेक अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या घरीच ईडीने छापेमारी केल्याने अधिकारी आणि कंत्राटदारांमध्ये खळबळ उडाली आहे. ईडीने आज कमीत कमी 25 ठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीतून अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.