‘विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम, त्यांची बोलती बंद’, अर्थसंकल्पावर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
"त्यांचे चेहरे बघण्यासारखे होते. अरे हे आकडे, योजना, काय-काय चाललंय? आम्ही काहीच शिल्लक ठेवलं नाही. त्यांची बोलती बंद झालीय", अशी टीका एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली.
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत आज अर्थसंकल्प (Maharashtra Budget) सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. पण या घोषणांवर विरोधकांनी टीका केली. फडणवीस यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या असल्या तरी त्यांची अंमलबजावणी कितपत होते याबाबत विरोधकांच्या मनात शंका आहे. विशेष म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे गाजरचा हलवा आहे, अशी टीका केली. त्यांच्या या टीकेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी ठाकरेंच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलं.
“खरं म्हणजे गाजर हलवा तरी आम्ही देतोय. त्यांनी काहीच दिलं नाही. त्यांनी स्वत: खाललं, दुसऱ्याला उपाशी ठेवलं. मी त्याच्यात जात नाही. आम्ही जो अर्थसंकल्प मांडलेला आहे तो वस्तुनिष्ठ आहे. याचे परिणाम तुम्हाला दृश्य स्वरुपात दिसतील. कामं सुरु होतील. आकडे फुगवण्यासाठी आम्ही हे केलेलं नाही. आम्ही फक्त कोरडी आश्वासनं दिलेली नाहीत. तर शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेलो आहोत”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
यावेळी पत्रकारांनी शेतकऱ्यांसाठी वीजबिल माफी करण्याबद्दल काही निर्णय झाला नसल्याचं विचारलं, त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, “वीजबिल माफीचं काय? मागच्यावेळेस अधिवेशनात घोषणा केली. पण अधिवेशनानंतर वीज कापली. असं आमचं सरकार करणार नाही. स्वत: उपमुख्यमंत्री त्या खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. या शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम सरकारने केलेलं आहे.”
“या अर्थसंकल्पात आम्ही प्रत्यक्षात दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे काही उत्तरच नाही. त्यांचे चेहरे बघण्यासारखे होते. अरे हे आकडे, योजना, काय-काय चाललंय? आम्ही काहीच शिल्लक ठेवलं नाही. त्यांची बोलती बंद झालीय”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
“सगळे महामंडळ सर्व समाजाला न्याय देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. पोटदुखीचं कारण काय? त्यांच्याकडे बोलायला जागा नाही. त्यांच्याकडे उत्तर नाही. त्यांचा एकदम करेक्ट कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांनी करुन टाकला. गेल्यावेळेस आपण पाहिलं की, मागच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली. पण त्याची पूर्तता केली का? ती पूर्तता आम्ही केली. आम्ही ते पैसे दिले. त्यांनी केलेल्या घोषणांची पूर्तता केलीय. आम्ही पळ काढलेला नाही”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
अर्थसंकल्पाबद्दल एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
“आजचं बजेट हे आतापर्यंतचं गेल्या दहा-पंधरा वर्षाच्या इतिहासातील सगळ्यात उत्तम आणि सर्वोत्कृष्ट बजेट आहे. त्यासाठी आमचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण त्यांनी या राज्याचा सर्वांगीण विकास डोळ्यांसमोर ठेवून हे बजेट तयार केलं आणि मांडलं. यामध्ये सर्व घटकांचा विचार केला. हे सर्वसमावेश बजेट आहे. यामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, तरुण, ज्येष्ठ सर्वच घटकांचा विचार केलेला आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“या बजेटमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आणि 14 दुष्काळी जिल्ह्यांमध्ये 1800 रुपये प्रती शेतकरी ही सगळ्यात मोठी ऐतिहासिक योजना आहे. केंद्राचे आणि राज्याचे पैसे मिळणार. यामुशे शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना खऱ्या अर्थाने आधार मिळेल. आत्महत्या थांबतील, हाच उद्धेश आमचा आहे. लेक लाडकी योजना पहिल्यांदाच महाराष्ट्रात सुरु झाली. अशी योजना आपल्या महाराष्ट्रात पहिल्यांदा होतेय”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
“मुलींना शिक्षण आणि पुढील वाटचालीसाठी दिलासा देणारी योजना आहे. असंघटीत कामगारांसाठी योजना आहे. ज्येष्ठांसाठी आम्ही योजना जाहीर केलीय. तरुणांनादेखील स्वयं रोजगार, स्वत:च्या पायांवर उभं करण्याचं काम या अर्थसंकल्पात केलेलं आहे. उद्योग वाढीसाठी आपण चालना दिलेली आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“आरोग्याची काळजी आपण घेतलेली आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरु केलेला आहे. त्याला मिळालेला प्रतिसाद आपण पाहिला आहे. या राज्यामध्ये त्याच धर्तीवर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे 700 दवाखाने आपण सुरु करतोय. या दवाखान्यांमध्ये मोफत ट्रिटमेंट आहे, मोफत 147 प्रकारच्या टेस्ट आहेत. सर्वसामान्य माणसाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी केलंय. महिला, तरुण, मुलांची तपासणी करण्याचं काम करतोय. अनेक प्रकल्प राबवत आहोत. गेल्या अडीच वर्षांत जे सगळं ठप्प होतं त्याला चालना देण्याचं काम करतोय. या अर्थसंल्पाचे रिझल्ट येत्या काही काळामध्ये दिसतील”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.