शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, एकनाथ शिंदे यांची विधानसभेतून महत्त्वाची घोषणा
शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी विधानसभेच्या दिशेला निघालेले. या दरम्यान आंदोलक शेतकरी संघटनांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक ठरली. कारण या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली.
मुंबई : शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेत आपल्या मागण्या मांडल्या. या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत शेतकऱ्यांच्या लाँग मार्चबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी कांदे उत्पादक शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली. राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान दिलं होतं. पण सरकारने यामध्ये आणखी 50 रुपयांची वाढ केली आहे. “कांद्यामध्ये झालेली घसरण लक्षात घेऊन 300 रुपयांवरुन आणखी 50 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.
“शेतकऱ्यांनी आदिवासींची वनजमिनी त्यांच्या नावावर करण्याची मागणी केलीय. याबाबत एक समिती गठीत करण्यात आलीय. एक महिन्यात ही समिती अहवाल देईल. शेतकरी संघटनेचे नेते जे पी गावित, विनोद निकोले हे आदिवासी आमदारही समितीचे सदस्य राहतील. कांद्याला प्रतिक्विटंल 350 रुपये देणार. त्यांचं आंदोलन राजकीय नव्हतं. जे पी गावित यांना विनंती करतो लाँग मार्च स्थगित करावा”, असं एकनाथ शिंदे आज सभागृहात म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज
विशेष म्हणजे विधानसभेत एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी सांगितली. खरंतर ते अमरावती येथील टेक्स्टाईल पार्क विषयी सांगत होते. त्याचवेळी त्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा उल्लेख करत त्यांनाही दिलासा मिळेल, अशी माहिती दिली. “या पार्कमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था बदलण्याकरता देखील मोठी महत्त्वाची मदत होणार आहे. म्हणून मी पंतप्रधान मोदी यांचे मनापासून राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
“आता हा टेक्सस्टाईल पार्क आल्याने दहा हजार कोटींची गुंतवणूक, एक लाख लोकांना थेट आणि दोन लाख लोकांना अप्रत्यक्षपणे असा तीन लाख लोकांना रोजगार मिळेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात समृद्धी येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सगळा आपला कॉटन बेल्ट आहे. त्यामुळे हा पार्क आल्यानंतर आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनादेखील त्याचा फायादा मिळेल. खरं म्हणजे या पार्कमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था बदलण्याकरता देखील मोठी महत्त्वाची मदत होणार आहे. म्हणून मी पंतप्रधान मोदी यांचे मनापासून राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो”, असं फडणवीस म्हणाले.