मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात आपल्याला विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीपासून मुक्त करा. तसेच आपल्याला संघटनात्मक कामाची जबाबदारी द्या, अशी इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं. अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी हवीय, अशा चर्चा जोर धरु लागल्या. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीदेखील प्रदेशाध्यक्षपदाची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे पुन्हा वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. या सगळ्या घडामोडींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलीय. एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिलीय.
विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका सांभाळत असताना आपण तितक्या प्रभावीपणे मुद्दे मांडू शकलो नाहीत, अशी काही जणांनी तक्रार केली. त्यामुळे आपल्याला विरोधी पक्षनेतेपदाच्या भूमिकेपासून मुक्त करा, असं अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले. यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “विरोधी पक्षनेते पदाबाबत अजित पवार म्हणत असतील, कदाचित त्यांची कुचंबांना झाली असेल, पण त्यांचा हा अंतर्गत विषय आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच “महाराष्ट्राला सर्व गोष्टी माहिती आहेत. जनता सुज्ञ आहे”, असंदेखील एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा जिल्हा दौऱ्यावर असून मागील तीन दिवसापासून त्यांनी त्यांच्या दरे या गावी मुक्काम केला आहे. सध्या कोयना जलाशयाचा पाणीसाठा आटल्यामुळे या भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबतची बैठक आज त्यांच्या दरे गावातील निवासस्थानी अधिकाऱ्यांसोबत घेतली. या बैठकीनंत एकनाथ शिंदे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली.
“105 गावातील पाणी समस्या बाबत योग्य निर्णय घेऊन या समस्येचे निरसन करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे. या भागात असणाऱ्या बुडीत बंधाऱ्यांना देखील पुनर्जीवित करून या गावांसाठी जलस्त्रोत निर्माण करण्याबाबत सूचना केल्या आहेत”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
“याबरोबर पर्यटनाच्या अनुषंगाने देखील तापोळा बामनोली भागाचा कायापालट करण्यासाठी महाबळेश्वर साताऱ्याहून येणाऱ्या पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने या भागात विविध योजना राबविल्या जाणार आहेत. गाळमुक्त धरण, गाळमुक्त तलाव ही योजना मागील सरकारच्या काळात बंद करण्यात आली होती. मात्र ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणीही ही योजना राबवली जात आहे”, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
विरोधी पक्षांची पाटण्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीवर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “असे सर्वजण बऱ्याचदा 2014, 2019 मध्ये एकत्र आलेत. मोदींच्या साठी सर्वजण एकवटले असले तरी त्यांच्यामध्ये एकमत दिसत नाहीत. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वजण एकत्र आले आहेत. ज्यावेळी मोदींवर त्यांनी टीका केली तेवढं त्यांचं महत्त्व वाढत गेलंय. कोणी कितीही प्रयत्न केले तरी 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकदीचं सरकार स्थापन होणार”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.