मुख्यमंत्र्यांनी घेतला वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय, विठुरायाच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांसाठी गुड न्यूज
आषाढी एकादशीला हजारो वारकरी हे विविध वाहनांच्या माध्यमातून राज्यभरातून पंढरपुरला जातात. या भाविकांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांसाठी खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशी जवळ आली आहे. सर्व मानाच्या पालख्या आता पंढरपूरच्या दिशेला प्रस्थान करत आहेत. टाळ, मृदूंग आणि अभंगाच्या गजरात पायी दिंड्या निघाल्या आहेत. अतिशय भक्तिमय असं वातावरण आहे. मानाच्या पालख्या जिथून पुढे चालत जात आहेत तिथे अतिशय भक्तिमय आणि अद्भूत असं वातावरण आहे. डोळ्यांमध्ये साठवून घ्यावे असे क्षण आहेत. हजारो भाविक हे विविध वाहनांच्या माध्यमातून राज्यभरातून पंढरपुरात जातात. या भाविकांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पंढरपुरला जाणाऱ्या मानाच्या पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या गाड्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे.
गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करून आवश्यक त्या संख्येनुसार स्टिकर्स पुरवा, असा आदेश सरकारने परिवहन विभागाला दिला आहे. वाहतूक पोलीस आणि संबंधीत आरटीओ यांच्याशी समन्वय साधून पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलीस चौक्यांमधून स्टिकर्स मिळणार आहेत.
आरटीओ कार्यालयांमध्ये आजपासून स्टिकर्स उपलब्ध होणार आहेत. पंढरपूरला जातेवेळी आणि परत पंढरपूरहुन येतेवेळी वारकऱ्यांना टोलवसुलीत सवलत मिळणार आहे. वारकऱ्यांच्या वाहनांना 13 जून ते 3 जुलैपर्यंत टोलमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा टोलमाफीचा निर्णय मानाच्या पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या जड आणि वाहनांसाठी घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश
सर्व पथकर नाक्यांवर स्वतंत्र पोलीस यांत्रणा ठेवावी. तसेच परिवहन विभागास देखील जादा बस गाड्या सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्ट्टीकोनातून HSP (Highway Security Patrolling) मार्फव पथकर नाक्याजवळ पोलिसांची व्यवस्था करावी. सार्वजनिक बाांधकाम विभाग (PWD), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामांडळामार्फत (MSRDC) डेल्टा / MSSC (Maharashtra State Security Council) फोर्स जास्त संख्येने तैनात करण्याचेही निर्देश दिले आहेत.
आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी मुंबई-पुणे ध्रुतगती महामार्गावर तसेच राज्यातील इतर सर्व रस्ते/ महामार्गावर रुग्णवाहीका आणि क्रेनची व्यवस्था करण्यात यावी. मुंबई-कोल्हापूर-बंगळुरु, पुणे-सोलापूर इ. राष्ट्रीय मार्गावर सुद्धा क्रेनची व्यवस्था करण्याचे निर्देश MSRDC, NHAI, PWD च्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना त्वरीत कळववण्याचे आदेश दिले आहेत.