50 खोक्यांच्या टीकेला खरंच 50 कोटींनी प्रत्युत्तर, एकनाथ शिंदे आणि रुग्णसेवेचं ‘वलय’!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील तब्बल 6200 रुग्णांना आर्थिक सहाय्यता दिली आहे. रुग्णांना वेळेवरती उपचार मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे '50 खोके एकदम ओके'च्या टीकेला शिंदेंनी 50 कोटींच्या आर्थिक मदतीतून प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई : महाराष्ट्रात एकेकाळी कोरोनाने हाहाकार माजवलेला. कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या प्रचंड वाढत होती. रोज कोरोनाबाधितांचा मृत्यू होताना दिसत होता. अतिशय भयावह परिस्थिती होती. पण तरीही काही माणसं दिवसरात्र रुग्णांना वाचवण्यासाठी धडपत होते. या धडपडणाऱ्यांमध्ये अनेक डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचं योगदान मोठंच आहे. त्यांच्या योगदानाविषयी कितीही कौतुक केलं तरी कमी होईल. त्यांच्यासोबत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मोठं काम केलं. या सर्व संकट काळात प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून लोकप्रतिनिधींनी मोठं काम केलं. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं योगदान मोठंच आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावरु एकनाथ शिंदे यांच्यावर टीका होत असली तरी त्यांच्याकडून होत असलेल्या रुग्णसेवेचा हात कुणीही पकडू शकत नाही. एकनाथ शिंदे यांच्या रुग्णसेवेबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या नऊ महिन्यांत कक्षाकडून तब्बल 6200 रुग्णांना एकूण 50 कोटी 55 लाख रुपयांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या दिवसापासून या योजनेचे मूळ संकल्पक तथा कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आणि त्यांच्या सर्व टीमने रुग्णसेवेत झोकून दिले आहे. मंगेश चिवटे यांच्याकडून करण्यात येत असणाऱ्या या सामाजिक कार्याची दखल अनेक पातळीवर घेण्यात आली आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून दर महिन्याला शेकडो रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून पहिल्याच जुलै महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर महिन्यात 336 रुग्णांना 1 कोटी 93 लाख, ऑक्टोबर महिन्यात 256 रुग्णांना 2 कोटी 21 लाख, नोव्हेंबर महिन्यात 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाख,डिसेंबर महिन्यात 8 कोटी 52 लाख, जानेवारी 2023 मध्ये 8 कोटी 89 लाख तर फेब्रुवारी 2023 मध्ये 10 कोटी 27 लाख, आणि मार्च 2023 मध्ये विक्रमी 11 कोटी 95 लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.
राज्यातील एकही सर्वसामान्य – गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही याची काळजी घ्या, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला पहिल्या दिवशी दिला होता. त्यांच्या सूचनेचे तंतोतंत पालन करण्याचा आणि रुग्णांना दिलासा देण्याचा आम्ही सर्व सहकारी प्रामाणिक प्रयत्न करतो, अशी प्रतिक्रिया कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी दिलीय.